यवतमधील बँक ऑफ महाराष्ट्रचे ए टी एम फोडणा-या तिघांना अटक ; ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
पुणे - सोलापूर महामार्गावरील यवत येथील.बँक ऑफ महाराष्ट्रचे ए टी एम फोडणा-या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलीसांनी अटक करून आरोपींकडून १० लाख रूपये ,मोटरसायकल ,गॅस कटर व इतर साहित्य जप्त केले.
अजय रमेशराव शेंडे वय - ३२ रा.सहजपूर ता.दौंड , शिवाजी उत्तम गरड रा.करंजी ता.सिसोड जि.वाशीम ,ऋषिकेश काकासाहेब किरतिके वय - २२ रा. देवधानूरा ता.कळंब जि.उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे असून आरोपींचे दोन साथीदार फरार आहेत.
या आरोपींनी यु ट्यूबवरून घरफोडी व एटीएम चोरी कशी करायची याची माहिती गोळा केली. त्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
१७ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री अडीच ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास यवत येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ए टी एम कापून चोरट्यांनी २३ लाख ८० हजार ७०० रूपये चोरून नेले होते.
त्या अगोदर १६ जानेवारीला कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए टी एम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार त्यांच्या पथकाने संपूर्ण सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा दोन तीन मोटरसायकलवरून आरोपी जाताना दिसून आले.त्यातील एका मोटरसायकलच्या मागे गॅस सिलेंडर लावलेला दिसून आला. त्यावरून शोध घेवून या तिघा आरोपींना पोलीसांनी पकडले.
पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.