यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयातील एम बी बी एस विद्यार्थ्याच्या हत्येतील आरोपींना अटक
Raju Tapal
November 14, 2021
45
यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एम बी बी एस विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी आरोपींना पोलीसांनी अटक केली.
डॉक्टरला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचे पोलीस अधिक्षकांनी पत्रकारांना सांगितले.
एम बी बी एस अंतिम वर्षाचा अशोक सुरेंद्र पाल वय -२४ रा. मेडिकल कॅम्पस या विद्यार्थ्याची मुलींच्या वसतीगृहाजवळ चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.
जवळपास १०० खब-यांच्या माध्यमातून घटनेच्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यात आली.
सी डी आर ,एस डी आर ,डमडाटा याची माहिती गोळा केल्यानंतर मुख्य आरोपींचा शोध लागला.
ऋषिकेश गुलाबराव सवळे वय - २३ रा.महावीरनगर ,प्रवीण संजीव गुंडजवार वय - २४ रा.सावित्रीबाई फुले सोसायटी व एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांना पोलीसांनी अटक केली.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ,चाकू जप्त केला.
पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अप्पर अधिक्षक डॉ. के.ए.धरणे , पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी , नंदकिशोर पंत, सहाय्यक निरीक्षक अमोल पुरी, गणेश वनारे, विवेक देशमुख, जनार्दन खंडेराव, योगेश रंधे, जमादार बंडू डांगे, नीलेश राठोड, बबलू चव्हाण, सलमान शेख, किशोर झेंडेकर, सुमित पाळेकर, अजय निंबोळकर, रोशनी जोगळेकर, गजानन क्षीरसागर, अमित कदम, मिलिंद दरेकर, नीलेश भुसे, अल्ताफ शेख यांनी ही कार्यवाही केली.
तीनही आरोपी दुचाकीवरून दारूची खेप टाकून महाविद्यालय परिसरातून जात होते. त्यावेळी मुलींच्या वसतीगृहाजवळ दुचाकीचा अशोक पाल या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यास कट लागला. यावरून शाब्दिक वाद झाला. या वादातच आरोपीने अशोकच्या छातीत व पोटात वार केले. दोन्ही वार वर्मी लागल्याने अशोकचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एम बी बी एस विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी प्रशासनाकडून योग्य दखल घेण्यात आली नाही .याप्रकरणी पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी शनिवार दि.१३ नोव्हेबरला सायंकाळी कँन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला.
जस्टीस फॉर अशोक पाल ,वुई वॉन्ट जस्टीस या घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडला.
पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काढण्यात आलेल्या कँन्डल मार्च मध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
अशोक पाल यांच्या खुनामुळे एका कुटूंबाचा आधार गेला. सरकारने त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत करावी , पुढे डॉक्टर बनून पाल याने अनेकांचे जीव वाचवले असते. दोषी गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, यापुढे महाविद्यालयांच्या वसतीगृह आणि कँम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालय आणि प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
Share This