तळेगाव ढमढेरे येथील गुजर प्रशालेत योग दिन उत्साहात साजरा
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी "जागतिक योग दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचीन काळापासून महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या योग साधनेचे महत्त्व संपूर्ण जगाला मान्य झाल्यामुळे सन २०१५ पासून संपूर्ण जगभर हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रशालेच्या प्रांगणात सकाळी ८ वाजता योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिकांना सुरुवात करण्यात आली. यासाठी प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी योग साधना करण्यासाठी घरून स्वतःचे वैयक्तिक साहित्य आणले होते. प्रशालेचे माजी पर्यवेक्षक प्रभाकर मुसळे तसेच अहिल्यानगर येथील अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर संघाचे प्रतिनिधित्व करणारी,पहिल्या महाराष्ट्र राज्य पॅरा योगासन चॅम्पियन स्पर्धेत सहभाग घेऊन महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवणारी गोल्ड मेडलिस्ट दिव्यांग दिया राजेंद्र जासूद,तसेच प्रशालेचे क्रीडा विभागाचे राजेंद्र भगत व नंदा सातपुते यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले व त्यांना योगासनासाठी व उत्तम सुदृढ निरामय आयुष्यासाठी व्यायाम करण्यासाठी प्रेरणा दिली
प्रभाकर मुसळे यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात योगसाधनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
आजच्या योग दिनाचे औचित्य साधून विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी प्रशालेस भेट दिली त्यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनीही विद्यार्थ्यांबरोबर योग साधना केली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, माणसाच्या मनाची मशागत करावयाची असेल तर आधी शरीर सुदृढ असायला हवं आणि शरीर सुदृढ हवं असल्यास त्यासाठी योग साधना व व्यायाम याला कुठलाच पर्याय नाही.
जवळपास एक तास चाललेल्या या योगसाधनेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या योग दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक शिवाजीराव आढाव यांनी केले. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती व्यायामाद्वारे विद्यार्थ्यांनी योग साधनेतून रेखाटल्या.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने प्रशालेतील चित्रकला विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
या योग दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही व्यायाम व योग साधनेचा आनंद लुटला.
या योग दिनानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,मानद सचिव अरविंद ढमढेरे,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर)