गवारेड्यांच्या कळपाच्या धडकेत अणावमधील युवक जखमी
स्थानिक ग्रामस्थांकडून वन विभागाचे अधिकारी धारेवर
कुडाळ :- कुडाळ तालुक्यातील अणाव गावात गवारेड्यांचा हैदोस सुरूच आहे.मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास पणदूर-सुकलवाड मार्गावरील अणाव-रताळे भागात दोन दुचाकीस्वारांना गवारेड्यांच्या कळपाने धडक दिली. यामध्ये लौकिक सागर राणे (वय २०) हा गंभीर जखमी झाला असून गणेश सुंदर आंगणे (१६) आणि ऋषी बाबाजी सावंत (१८) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी ग्रामस्थांकडून वनविभागातील अधिकारी धारेवर धरले.
मागील १५ ते २० दिवसांपासून गवारेड्यांचा अणावमधील जंगलांमधे मुक्काम असून वनविभागामार्फत ठोस अशी कारवाई करण्यात कुचराई होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.