शिरूर येथील बेपत्ता युवा व्यावसायिकाचा मृतदेह नारायणगव्हाण येथील विहीरीत
----------------------
शिरूर येथील युवा व्यावसायिक आदित्य चोपडा गेल्या दोन तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह नारायणगव्हाण जि.अहमदनगर येथील महामार्गालगतच्या विहीरीत आढळून आला आहे.
कडूस ता.पारनेर येथील रहिवासी असलेले चोपडा परिवार व्यवसायानिमित्त शिरूर जि.पुणे येथे स्थायिक झालेले आहेत.
या परिवारातील युवा व्यावसायिक आदित्य चोपडा गेल्या दोन तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याची फिर्याद चोपडा कुटूंबियांनी सुपा पोलीस स्टेशनला दिली होती.
बुधवार दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी काही तरूण बबन धोंडीबा नवले यांच्या विहीरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह आढळून आला.
त्यांनी ही माहिती तात्काळ जवळील नागरिकांना व सुपा पोलीसांना सांगितली.
पोलीसांनी तात्काळ घटंनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविली असता मृतदेह आदित्य चोपडा यांचा असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत तातडीने नातेवाईकांना कळविण्यात आले.