राज्यावर स्वाइन फ्लूचे संकट;
डेंग्यूचेही डोके वर,
सर्दी-खोकल्याचा जाच
गेल्या दोन वर्षांपासून असलेले कोरोनाचे संकट काहीसे निवळले असले तरी यंदा स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि दीर्घकाळ चालणाऱ्या सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण राज्यातील अनेक भागांत वाढत आहेत.पावसाळा लांबत चालल्यामुळे तसेच वातावरणातील विचित्र बदलांमुळे देखील हा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यंदा जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत राज्यात ३५८५ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला.राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, स्वाइन फ्लूचे राज्यातील सर्वाधिक १२२८ रुग्ण आणि ४६ मृत्यू पुणे जिल्ह्यात आहेत. नागपूरमध्ये ५२४ रुग्ण आणि २८ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. नाशिकमध्ये २४४ रुग्ण आणि १५ मृत्यू, ठाण्यात ५६४ रुग्ण आणि १६ मृत्यू तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनुक्रमे ४५ आणि १९२ रुग्ण तसेच १३ आणि १९ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि सणासुदीच्या काळात तसेच सुट्टीनिमित्त बाहेर जाताना खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात हिवतापाचे १२०, तर लेप्टोचेही १८ रुग्ण आढळले . डेंग्यूबाबत प्रतिबंधात्मक काळजी घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे ७८ नवीन रुग्ण आढळले.
राज्य सरकारच्या सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा तब्बल ३५८५ रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असून २०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबई ठाण्यात हिवताप, लेप्टो, डेंग्यू, अतिसार, कावीळीची साथ असून डोळ्यांचे आजारही होत आहेत.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको…
पुण्यातील संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनूरकर म्हणाले, स्वाइन फ्लूमधील गुंतागुंतींमुळे रुग्णालयात विशेषत: अति दक्षता विभागात दाखल करण्याची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाच्या रुग्णांना घरगुती उपचारांमध्येही पूर्ण बरे वाटत आहे. मात्र, विषाणूजन्य आजारांकडे झालेले दुर्लक्ष, लक्षणे अंगावर काढणे या बाबींमुळे स्वाइन फ्लूमध्ये गुंतागुंत निर्माण होत आहे.
सर्दी-खोकल्याचा मुक्काम वाढला….
मुंबई -ठाण्यात सध्या दवाखान्यात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांमध्ये ६० ते ७० टक्के रुग्ण हे सर्दी – खोकल्याचे असून डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. औषध घेऊनही आठवडा-दोन आठवडा खोकला जात नसल्यामुळे रुग्णांमध्ये भीती पसरली आहे.
डोळ्यांचीही साथ
डोळ्यांच्या संसर्गामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच डोळ्याची लागण होत आहे.