पृथ्वीवर एकीकडे माणसांची गर्दी झालेली असतानाच जन्मदरात मोठी घट झालेली दिसून येते आहे. महिला आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत घसरण झाल्यामुळे प्रजनन दरावर विपरित परिणाम झाला आहे.
हे फक्त एका देशात नाही तर जगभरातच दिसून येतं आहे. मात्र यात पूर्ण लक्ष महिलांवर केंद्रित केलं जातं. प्रत्यक्षात पुरुषांमधील प्रजनन क्षमता, निपुत्रिक राहिल्यामुळे पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हा देखील तितकाच महत्त्वाचा मात्र दुर्दैवानं अत्यंत दुर्लक्षित मुद्दा आहे. या लेखात ताज्या संशोधनांच्या आधारे त्याविषयी जाणून घेऊया.
जगभरात प्रजनन दरात घट होते आहे, तीही व्यक्त केलेल्या अंदाजाहून अधिक वेगानं. चीनमध्ये जन्मदरातील घट विक्रमी पातळीवर आहे.
संपूर्ण लॅटिन अमेरिकेत प्रत्येक देशातील अधिकृत जन्मदर व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे.
अगदी मध्यपूर्वेत आणि उतर आफ्रिकेत देखील जन्मदरात अपेक्षेपेक्षा खूप अधिक वेगानं नाट्यमयरित्या घट होते आहे. छोटी कुटुंब किंवा अनेकांना कमी अपत्ये असल्याचा तो परिणाम आहे.
मात्र त्याचबरोबर आणखी एक कारण आहे, ते म्हणजे जगातील जवळपास प्रत्येक देशात अनेकजणांना एकही अपत्य नाही.इसाबेल यांचा त्यांच्या तिशीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्रासदायक ब्रेकअप झाल्यामुळे त्यांना मुलं नको आहेत. त्यानंतर त्यांनी न्युंका मड्रेस (Nunca Madres) (आई कधीच नाही) नावाच्या गटाची स्थापना केली.
मुलं नको असण्याचा पर्याय निवडल्याबद्दल त्यांना दररोज टीकेला सामोरं जावं लागतं. त्या कोलंबियात राहतात. ही टीका फक्त तिथेच होते असं नाही.
त्यांच्यावर जी विविध प्रकारची टीका होते, त्याबद्दल इसाबेल सांगतात, "अनेकदा एक गोष्ट जी मी ऐकते ती म्हणजे, तुम्हाला याचा पश्चाताप होईल, तुम्ही स्वार्थी आहात. तुम्ही म्हातारे झाल्यावर तुमची काळजी कोण घेणार?."
इसाबेल यांच्यासाठी अपत्य नसणं हा स्वेच्छेनं निवडलेला पर्याय आहे. मात्र इतरांसाठी, तो जैविक वंध्यत्वाचा परिणाम आहे. अनेकांसाठी ते इतर कारणांमुळे झालेलं आहे.
मूल हवं असणाऱ्या लोकांच्या बाबतीत ही गोष्ट, अनेक कारणं एकत्र आल्यामुळे होतं. ज्याला समाजशास्त्रज्ञ "सामाजिक वंध्यत्व" म्हणतात.
अलीकडच्या काळात झालेल्या संशोधनातून असं आढळून आलं आहे की इच्छा असून देखील त्यांना मुलं होऊ शकत नाही... ही गोष्ट पुरुषांच्या बाबतीत अधिक होते, विशेषकरून अल्प उत्पन्न गटातील पुरुषांच्या बाबतीत हे होतं.
2021 मध्ये नॉर्वेमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळून आलं की सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या पाच टक्के पुरुषांमध्ये अपत्य नसण्याचा दर 72 टक्के होता.
तर सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या पुरुषांमध्ये तो फक्त 11 टक्के होता. मागील 30 वर्षांमध्ये ही दरी जवळपास 20 टक्क्यांनी रुंदावली आहे.
रॉबिन हॅडली जेव्हा त्यांच्या तिशीत होते तेव्हा त्यांना पिता होण्याची तीव्र इच्छा होती. त्यांनी विद्यापीठात शिक्षण घेतलेलं नाही. मात्र उत्तर इंग्लंडमधील विद्यापीठातील प्रयोगशाळेत ते तांत्रिक फोटोग्राफरची नोकरी करत होते.
त्यांच्या विशीत त्यांचं लग्न झालेलं होतं. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्याआधी ते त्यांच्या पत्नीसह बाळासाठी प्रयत्न करत होते
ते आर्थिक अडचणीत होते. त्यांनी तारण ठेवलेल्या गोष्टीबाबत पैसे चुकवण्यासाठी ते संघर्ष करत होते. त्यामुळे त्यांना फारसं बाहेर जायला परवडत नव्हतं.
त्यामुळे डेटिंग करणं, गाठीभेटी घेणं हे त्यांच्यासमोरचं एक आव्हान होतं. हळूहळू जसे त्यांचे मित्र आणि सहकाऱ्यांना मुलं झाली तशी त्यांच्यात हरण्याची किंवा कमतरतेची भावना निर्माण झाली.
"मुलांच्या वाढदिवसाची शुभेच्छा कार्ड किंवा लहान बाळांसाठी जमवलेल्या वस्तू पाहिल्यानंतर तुमच्याकडून काय अपेक्षित आहे किंवा तुमच्याकडे काय नाही या गोष्टीची जाणीव होते. या गोष्टींशी निगडीत एक वेदना असते," असं ते म्हणतात.
आपल्या स्वत:च्या अनुभवांमुळे त्यांना निपुत्रिक पुरुषांबद्दल एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
त्यांनी तसं पुस्तक लिहिल्यावर त्यांना जाणीव झाली की "प्रजननावर परिणाम करणाऱ्या अर्थशास्त्र, जीवशास्त्र, घटनांचं टायमिंग, नातेसंबंधांची निवड, या सारख्या सर्व घटकांचा त्यांना फटका बसला आहे."
त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्यांनी वाचलेल्या वृद्धत्व आणि प्रजननावरील बहुतांश शिष्यवृत्त्यांमध्ये, मूलबाळ नसलेल्या पुरुषांचा उल्लेख किंवा संदर्भ नव्हता. राष्ट्रीय आकडेवारीमध्ये देखील पुरुषाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच.
सामाजिक वंध्यत्वासाठी अनेक कारणं आहेत. मूल होऊ देण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसंपत्तीचा अभाव किंवा योग्य वेळी योग्य व्यक्तीशी नातं निर्माण न होणं ही त्यातीलच काही कारणं. मात्र याच्या मूळाशी काहीतरी वेगळंच आहे असं अॅना रॉचकर्च म्हणतात.
त्या फिनलंडच्या पॉप्युलेशन रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये समाजशास्त्रज्ञ आणि लोकसंख्याशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ फिनलंड आणि युरोपातील प्रजनन हेतूचा अभ्यास केला आहे. आपण मुलांकडे कसं पाहतो? यात त्यांनी प्रचंड बदल पाहिले आहेत.
जगात, आशिया खंडाबाहेर ज्या ठिकाणी निपुत्रिक असण्याचा दर सर्वाधिक आहे. त्यात फिनलंड आहे.
मात्र 1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरूवातीला, प्रजनन दरातील ही घट, जगभरातील बाल-अनुकूल धोरणांद्वारे घटलेल्या प्रजनन दराशी लढा देण्यासंदर्भात स्वीकारली गेली होती.
पालकत्वाची योग्य रजा मिळते आहे, बाल संगोपन परवडणारं आहे आणि पुरुष आणि महिला घरातील कामाची जबाबदारी समान पद्धतीने घेतात, असं ते स्वरुप होतं.
मात्र 2010 पासून, फिनलंडमधील प्रजनन दर जवळपास एकतृतियांशानं घटला आहे
प्राध्यापक रॉचकर्च म्हणतात की, विवाहाप्रमाणेच मूल होणं याकडे आयुष्यातील एक टप्पा म्हणून पाहिलं जायचं. गेल्या अनेक पिढ्यांत तरुणांनी वयस्क होत असताना, असंच काहीसं केलं होतं.
मात्र आता या गोष्टीकडे आयुष्यातील महत्त्वाची उपलब्धी किंवा महत्त्वाची बाब म्हणून पाहिलं जातं. आता जर तुमची आयुष्यातील उद्दिष्टं साध्य झाली असतील तर तुम्ही काय करता.
"समाजातील वेगवेगळ्या सर्व वर्गांमधील लोक अपत्य असण्याकडे आयुष्यातील अनिश्चिततेतील वाढ या दृष्टीनं पाहतात," असं प्राध्यापक रॉचकर्च म्हणतात.
फिनलंडमध्ये त्यांना असं आढळलं की सर्वात श्रीमंत महिला अनिच्छेनं निपुत्रिक राहण्याची शक्यता कमी आहे. त्याउलट अल्प उत्पन्न गटातील पुरुषांना मात्र मूलबाळ हवं असताना ते निपुत्रिक राहत आहेत.
भूतकाळातील परिस्थितीचा विचार करता हा मोठा बदल आहे. आधी गरीब कुटुंबातील लोक लवकर संसारी जबाबदाऱ्या सांभाळू लागायचे. ते फारसं शिकत नसत, त्यामुळे मग लवकर नोकरी करू लागायचे आणि अगदी तरुण वयातच विवाह करून संसाराची सुरूवात करायचे.
पुरुषांच्या बाबतीत आर्थिक अनिश्चिततेचा मोठा प्रभाव असतो, ज्यामुळे त्यांना मूलबाळ होण्याची शक्यता फारच कमी होते. याला समाजशास्त्रज्ञ "द सिलेक्शन इफेक्ट" (निवडीचा परिणाम) म्हणतात.
यात महिला आपला आयुष्याचा जोडीदार निवडताना सामाजिकदृष्ट्या आपल्याच वर्गातील किंवा त्याहून वरच्या वर्गातील पुरुषाची निवड करतात.
"माझं नातं बौद्धिकदृष्ट्या आणि आत्मविश्वासाच्या बाबतीत माझ्या कुवतीबाहेर होतं असं मला दिसतं आहे," असं रॉबिन हॅडली ते तिशीत असताना तुटलेल्या नात्याबद्दल सांगतात.
"मला वाटतं विचार करण्यावर सिलेक्शन इफेक्ट हा घटक असू शकतो."
जेव्हा त्यांचं वय जवळपास 40 वर्षे होते, तेव्हा त्यांची भेट सध्याच्या त्यांच्या पत्नीशी झाली. त्यांच्या पत्नीनं त्यांना विद्यापीठात जाण्यासाठी आणि पीएचडी मिळवण्यासाठी पाठिंबा दिला.
"जर माझी पत्नी नसती तर आज मी जो काही आहे, तसा मी नसतो." असं रॉबिन पुढे सांगतात.
रॉबिन आणि त्यांच्या पत्नीनं मूल होऊ द्यायचं ठरवलं तेव्हा ते दोघं त्यांच्या चाळीशीत होते. त्यामुळे मूल होण्यासाठी खूपच उशीर झाला होता.
जगभरातील आणखी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, जगातील 70 टक्के देशांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा पुढे आहेत. याची परिणती येल विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ मार्सिया इनहॉर्ननं यांनी म्हटलेल्या "द मेटिंग गॅप" मध्ये होते आहे.
म्हणजेच महिला आणि पुरुष यांच्या एकत्र येण्यावर, शारीरिक संबंध ठेवण्यावर किंवा जोडीदार बनवण्यावर याचा नकारात्मक परिणाम होतो आहे. कारण चांगलं शिक्षण घेतलेल्या किंवा उच्च शिक्षित महिला त्याच शैक्षणिक पात्रतेच्या पुरुषांना प्राधान्य देतात.
युरोपात महिला आणि पुरुषांमधील शैक्षणिक पात्रतेतील फरकामुळे ज्या पुरुषांनी उच्च शिक्षण घेतलेलं नाही किंवा विद्यापीठातील पदवी घेतलेली नाही, ते निपुत्रिक राहण्याची शक्यता अधिक आहे.
बहुतांश देशांकडे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसंदर्भात फारशी चांगली आकडेवारी नाही. कारण जन्माची नोंद करताना ते फक्त आईची प्रजनन पार्श्वभूमी लक्षात घेतात. याचाच अर्थ निपुत्रिक पुरुष एक मान्यताप्राप्त "श्रेणी" म्हणून अस्तित्वात नाहीत. आकडेवारी तयार करताना अशा पुरुषांना लक्षातच घेतलं जात नाही.
काही नॉर्डिक देशांमध्ये (उत्तर युरोप आणि उत्तर अटलांटिक क्षेत्रात येणारे देश. उदाहरणार्थ डेन्मार्क, फिनलंड, आईसलंड, नॉर्वे, स्वीडन) मात्र प्रजनन क्षमतेच्या बाबतीत आई आणि पुरुष दोघांचीही माहिती घेतली जाते.
नॉर्वेमधील एका अभ्यासात असं आढळून आलं की श्रीमंत आणि गरीब पुरुषांमधील अपत्य असण्यासंदर्भातील प्रचंड असमानता लक्षात घेता, असंख्य पुरुष "मागे राहिले" आहेत.
जन्मदरात घट होण्यामधील पुरुषांच्या भूमिकेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, असं विन्सेंट स्ट्रॉब म्हणतात. ते ऑक्सफर्ड विद्यापीठात पुरुषांचं आरोग्य आणि प्रजनन क्षमता यावर अभ्यास करतात.
प्रजजन दरात घट होण्यामध्ये "पुरुषांमधील अस्वस्थतता किंवा अनारोग्या"ची किती भूमिका आहे हे जाणून घेण्यात त्यांना रस आहे. पुरुषांमधील अस्वस्थतता म्हणजे समाजात महिला अधिक सक्षम झाल्यामुळे तरुण पुरुषांमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि त्यांच्याकडून असलेल्या समाजाच्या पुरुषत्व आणि पुरुषत्वातील बदलासंदर्भातील अपेक्षा.
या गोष्टीला "पुरुषत्वाचं संकट" असंही म्हटलं जातं. आणि अँड्यू टेट सारख्या उजव्या विचारसरणीच्या महिला विरोधी विचारांच्या व्यक्तीची लोकप्रियता हे त्याचं प्रतीक आहे.
स्ट्रॉब यांनी बीबीसीला सांगितलं, "सध्याच्या काळात कमी शिकलेल्या पुरुषांची स्थिती काही दशकांआधीच्या तुलनेत खूपच वाईट आहे."
अनेक श्रीमंत आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी श्रमाची किंवा हाताने करण्यात येणाऱ्या कामाचं मूल्य कमी झालं. तंत्रज्ञानामुळे सर्वत्र ऑटोमेशन किंवा यांत्रिकीकरण होतं आहे.
परिणामी हाताने करायची कामं किंवा नोकऱ्या कमी होत चालल्यानं त्या अधिक असुरक्षित झाल्या आहेत. यामुळे ज्यांनी विद्यापीठातून पदव्या घेतल्या आहेत आणि ज्यांनी त्या घेतलेल्या नाहीत अशांमधील दरी वाढली आहे.
यामुळे "मेटिंग गॅप" म्हणजे महिला आणि पुरुषांच्या एकमेकांचा जोडीदार होण्यासंदर्भातील दरी देखील रुंदावली आहे. याचा पुरुषांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो आहे.
स्ट्रॉब म्हणतात, "जागतिक स्तरावर मादक द्रव्यांचा किंवा दारूचा वापर वाढतो आहे. त्यातही पुरुष ज्या वयात सर्वाधिक प्रजननक्षम असतात किंवा तरुण असतात त्याच वयात मादक द्रव्यांचा वापर करण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. हे सर्वत्र आहे. आफ्रिका, दक्षिण अमेरिका असो की उत्तर अमेरिका असो."
"या सर्वांचा सामाजिक आणि जैविक प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होतो. या प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक बदल आणि प्रजननक्षमता यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधाचा मुद्दा कुठेतरी खरोखरंच दुर्लक्षिला गेला आहे असं मला वाटतं," असं स्ट्रॉब म्हणतात.
या गोष्टीचा पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मूलभूत परिणाम होऊ शकतो. "विवाहीत किंवा जोडीदार असलेल्या पुरुषांच्या तुलनेत एकट्या किंवा अविवाहित पुरुषांच्या आरोग्याची अधिक वाईट असते," असं स्ट्रॉब पुढे सांगतात.
स्ट्रॉब आणि हॅडली यांना आढळलं की प्रजननाशी निगडीत संवादामध्ये पूर्णपणे महिलांवरच लक्ष केंद्रित केलं जातं. त्याचबरोबर जन्मदर किंवा प्रजननाशी निगडीत मुद्दे हाताळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणांमध्ये समाजाचं पूर्ण प्रतिबिंब उमटत नाही.
कारण या धोरणांमध्ये फक्त महिलांचा विचार करण्यात आल्यामुळे ती अपूर्ण असतात. त्या पुरुषांचा विचार केलेला नसतो.
स्ट्रॉब यांना वाटतं की आपण प्रजननाच्या मुद्दयाकडे पुरुषांच्या आरोग्याची समस्या म्हणून (सुद्धा) लक्ष केंद्रित केलं पाहिजे. यात आपण पित्यांची काळजी घेण्याचीही चर्चा केली पाहिजे.
"युरोपात 100 पुरुषांपैकी फक्त एक पुरुष आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी करियरला ब्रेक देतो किंवा काही काळ नोकरी सोडतो किंवा तशी सुट्टी घेतो. त्याउलट तीनपैकी एक महिला बाळाच्या संगोपनासाठी करियरला ब्रेक देतात," असं ते म्हणतात.
बाळाचं संगोपन करणं हे पुरुषांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं याचे ढीगभर पुरावे असताना ही स्थिती आहे.
न्युंका मड्रेस या आपल्या संस्थेच्या माध्यमातून, इसाबेल यांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय बॅंकेतील काही प्रतिनिधींची मेक्सिकोत भेट घेतली.
त्या प्रतिनिधींनी इसाबेल यांना सांगितलं की पिता झालेल्या सर्व पुरुषांना सहा आठवड्यांची पालकत्वाची रजा देऊ केल्यानंतर सुद्धा त्यातील एकाही ती रजा घेतली नाही.
"लॅटिन अमेरिकेतील पुरुषांना वाटतं की बाल संगोपन हे महिलांचं काम आहे," असं त्या म्हणाल्या.
"आपल्याला चांगल्या आकडेवारीची आवश्यकता आहे," असं रॉबिन हॅडली म्हणाले. जोपर्यंत आपण पुरुषांच्या प्रजनन क्षमतेची नोंद करत नाही, तोपर्यंत आपल्याला या विषयाचं पूर्ण आकलन होणार नाही किंवा पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा काय परिणाम झाला आहे हे कळणार नाही.
प्रजनन क्षमतेच्या चर्चेतील पुरुषांची अनुपस्थिती रेकॉर्ड्सच्या पलीकडे आहे. प्रजनन क्षमता कशी घटत जाते यावर विचार करणं आवश्यक आहे, या गोष्टीबद्दल आता तरुण महिलांमध्ये जागरुकता वाढली असली तरी तरुण पुरुषांमध्ये या मुद्द्यावर कोणतंही संभाषण होत नाही किंवा याबद्दल जागरुकता नाही.
महिलांप्रमाणेच पुरुषांचं देखील एक जैविक घड्याळ असतं, असं हॅडली म्हणतात. हा मुद्दा मांडताना, पुरुषांमध्ये वयाच्या 35 वर्षांनंतर शुक्राणूंची प्रजनन क्षमता कमी होत जात असल्याचं दाखवणाऱ्या एका संशोधनाकडे त्यांनी लक्ष वेधलं.
प्रजननक्षमतेच्या समस्येला तोंड देणाऱ्या पुरुषांच्या या गटाची चर्चा करणं, त्याची दखल घेणं हा सामाजिक वंध्यत्वाशी लढा देण्याचा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग म्हणजे पालकत्वाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवणे.
निपुत्रिक किंवा मूलबाळ नसण्याच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या सर्व संशोधकांनी एका मुद्द्याकडे आवर्जून लक्ष वेधलं तो म्हणजे अपत्य नसलेल्या लोकांची देखील बाळाच्या संगोपनात महत्त्वाची भूमिका आहे.
अॅना रोटकर्च सांगतात की या संकल्पनेला वर्तणूक पर्यावरणशास्त्रज्ञ अॅलोपॅरेंटिंग म्हणतात.
मानवी उक्रांतीच्या बहुतांश टप्प्यात एखाद्या बाळाचं संगोपन आसपासचे एक डझनहून अधिक लोक करत होते.
संशोधन करताना डॉ. हॅडली अनेक निपुत्रिक पुरुषांशी बोलले होते. त्यांच्यातील एकजण स्थानिक फुटबॉल क्लब मध्ये नियमितपणे भेटणाऱ्या एका कुटुंबाबद्दल बोलला होता.
शाळेतील एका प्रकल्पासाठी दोन मुलांना आजी-आजोबांची आवश्यकता होती. मात्र त्या दोघांनाही आजी-आजोबा नव्हते.
त्यावेळेस ती व्यक्ती त्या मुलांचा सरोगेट आजोबा झाले होते आणि अनेक वर्षांनी जेव्हा त्या मुलांनी त्यांना फुटबॉल क्लबमध्ये पाहिलं तेव्हा ते म्हणाले, "हाय आजोबा". अशा प्रकारे हाक मारल्यानं, ओळख दाखवल्यानं खूप छान वाटलंस असं ते म्हणाले.
यातून मुलं, कुटुंब यासंदर्भातील पुरुषांची भानविक स्थिती लक्षात येते.
"मला वाटतं, बहुतांश निपुत्रिक पुरुष मुलांच्या संगोपनाशी निगडीत अशाप्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी असतात. मात्र ते सर्व अदृश्य असतं," असं प्राध्यापक रॉटकर्च म्हणतात.
"या गोष्टी जन्माच्या नोंदणीमध्ये, दस्तावेजांमध्ये दिसत नाहीत. मात्र त्या खरोखरच महत्त्वाच्या आहेत." असं ते पुढे म्हणतात.