रायते महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा मार्गदर्शन’ उपक्रम..
विद्यार्थी आणि शिक्षकांना मिळाले मोलाचे धडे!
कल्याण तालुका पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती;
ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन
जैतू मुठोळकर.
रायते:- आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर वाढत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंतेचा विषय बनत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ,भिवंडी संचलित रायते विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,रायते (ता.कल्याण) येथे ‘सायबर सुरक्षा मार्गदर्शन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण तालुका पोलीस स्टेशन (मांडा-टिटवाळा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या मार्गदर्शन वर्गात सायबर क्राईम पोलीस हवालदार अनिल शेंडगे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. इंटरनेटचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी,ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार कसे ओळखावेत आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे,याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक विशाल चोरगे यांनी इंटरनेट सेवा वापरताना घ्यावयाची काळजी,सोशल मीडियावरील संभाव्य धोके आणि ऑनलाइन फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षित उपाययोजनांची माहिती दिली. डिजिटल माध्यमांचा वापर करताना सतर्कता बाळगणे आणि कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची खातरजमा करणे किती महत्त्वाचे आहे,याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक के.के.बावस्कर,शालेय समितीचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार जैतू मुठोळकर आणि गोवेली पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ए.एस.आय.) मुस्तफा शेख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक के.के.बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षक पी.एन.सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. पोलीस प्रशासनाच्या या जनजागृतीपर उपक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना सायबर सुरक्षेचे महत्त्व समजण्यास मदत झाली. अशा उपक्रमांमुळे डिजिटल व्यवहारांमधील धोके ओळखून सुरक्षित इंटरनेट वापराची सवय विकसित होण्यास निश्चितच हातभार लागेल,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.