शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात पाठपुरावा...
जिल्हांतर्गत बदल्या, आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता आणि वरिष्ठ वेतनश्रेणीच्या प्रश्नांवर चर्चा
अमरावती/मुंबई : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जुन्नर तालुका व पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या समवेत ही मंत्रालयीन भेट घेण्यात आली.
ग्रामविकास विभागाच्या अवर सचिव ज्योत्स्ना अर्जुन यांची भेट घेऊन शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बदली प्रक्रियेतील प्रलंबित मुद्द्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला.
आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना देण्यात येणाऱ्या १,५०० रुपये प्रोत्साहन भत्त्यासह अन्य प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. संबंधित प्रश्नांची दखल घेऊन त्यावर कार्यवाही व्हावी, यासाठी शिष्टमंडळाने पाठपुरावा केला.
दरम्यान, शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. मूळ नेमणुकीपासून वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील फाईलवरही चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रयत्न करण्यात आले.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनस्तरावर सकारात्मक निर्णय होऊन प्रश्नांची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने शिष्टमंडळाने संबंधित विभागांशी संवाद साधला.
या वेळी प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस राजेंद्र गारे, प्रसिद्धी प्रमुख नामदेव मुंढे, सल्लागार प्रशांत बावबंदे आणि वकील ललित जोशी उपस्थित होते.असे बाळासाहेब लांघी
कार्याध्यक्ष,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती यांनी दिल्याचे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.