सोनारानं ४५ लाख रुपये नोकराकडे दिले, बँकेत जाण्याऐवजी झाला फुरर
कल्याण : एका सोनाराने नोकराला ४५ लाखांची रोकड भरण्यासाठी दिली. मात्र इतकी रोकड पाहून नोकराची नियत फिरली. रोकड घेवून तो पळून गेला. याबाबत कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात नोकर रमेश देवासी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्याणमधील कमलेश ज्वेलर्सच्या मालकाने त्यांच्या दुकानात काम करत असलेल्या रमेश देवासी याला ४५ लाख ४ हजार रुपये रोकड बँकेत भरण्यासाठी दिली होती. इतकी मोठी रक्कम पाहून रमेश याची नियत फिरली. त्याने ही रक्कम बँकेत न भरता तेथून पळ काढला. बराच वेळ उलटूनही रमेश परत न आल्याने या सोनाराला संशय आला. त्याने रमेशची शोधा शोध सुरू केली. परंतु, रमेशने पैसे देखील बँकेत भरले नसल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या ज्वेलर्सने कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करत रमेश देवासी याचा शोध सुरू केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दीपक सरोदे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. तपासादरम्यान पोलिसांचे दोन पथके राजस्थान व गुजरात येथे रवाना झाली. अखेर राजस्थान येथून जगदीश देवासी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 41 लाख 15 हजार रुपये रक्कम देखील जप्त करण्यात आली. तर मुख्य आरोपी रमेश देवासी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.