मृतांचा खरा आकडा 100 च्या आसपास असल्याचं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे.
खेळातल्या पंचांनी दिलेल्या एका निर्णयाला लोकांनी विरोध दर्शवायला सुरुवात केल्यानंतर ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे.
दुसऱ्या देशातून गिनीमध्ये खेळायला आलेल्या लाबे या गटातून दोन खेळाडूंना बाद करून इन्झेरेकोरमधल्या गटाला एक पेनल्टी किक पंचांनी दिली होती.
घडलेली घटना दुःखद असून त्यासाठी जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे, असं देशाचे पंतप्रधान बाह ओरी म्हणाले. त्यांनी जाहीर केलेल्या निवेदनात मृतांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली आहे.
“रुग्णालयात दिसेल तिथे मृतदेह एकामागे एक रांगेत ठेवले होते. शवागार संपूर्ण भरून गेलं. त्यानंतर काही मृतदेह रुग्णालयात जमिनीवर पडलेले दिसत होते,” असं एका डॉक्टरांनी एएफपी वृत्तसंस्थेला नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
पंचांच्या निर्णयावर संतापलेल्या लाबे गटाच्या समर्थकांनी मैदानावर दगडफेक सुरू केली. तेव्हा गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला गेला, असं स्थानिक वृत्तसंस्था सांगतात.
“पंचांच्या वादग्रस्त निर्णयानंतरच याची सुरुवात झाली. समर्थक थेट मैदानावर उतरले,” उपस्थितांपैकी एकाने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं.
याबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हीडिओ आणि फोटोची सत्यता तपासली. त्यात स्टेडियमच्या बाहेर निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती, भिंत चढून जाण्याचा प्रयत्न करणारे लोक आणि मैदानावर पडलेले मृतदेह दिसत आहेत. पडलेल्या मृतदेहांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे.
घटनेच्यावेळी स्टेडियम जवळपास हजारो लोकांनी काठोकाठ भरलेलं होतं असं पॉल साकोवोगी हे स्थानिक पत्रकार बोलताना सांगत होते.
“बाहेर पडायला एकच मार्ग होता. गोंधळ सुरू झाला तेव्हा सामना पहायला आलेले बहुतेकजण त्या एकाच छोट्या दरवाज्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागले. काही लोक बाहेर जाण्यासाठी भिंत चढू लागले. ज्यांना त्यात यश आलं नाही ते खाली पडले,” साकोवोगी म्हणाले.
परिसरातलं इंटरनेट बंद केलं होतं आणि जखमींना घेऊन गेले त्या रुग्णालयाच्या दारावर पोलिसांचा पहारा होता, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
“रुग्णालयाच्या तीन दारांत जवळपास 6 पोलीस मला दिसले. ते फक्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी देत होते. इतरांना परत जायला सांगण्यात येत होतं,” ते म्हणाले.
जखमींना वैद्यकीय आणि मानसिक आधाराच्या दृष्टीने लागेल ती मदत करण्याचं वचन पंतप्रधान बाह यांनी दिलं आहे.
तीव्र वेदना देणारा हा क्षण असल्याचं फेगीफूट या गिनीमधल्या फुटबॉल संघटनेनं म्हटलं आहे. फूटबॉल हा लोकांची मनं एकत्र आणणारा खेळ असायला हवा, त्यांच्या दुःखाचं कारण होणं हा त्याचा हेतू नाही असं ते म्हणतायत.
“मृत्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” कॉन्फेडेरशन ऑफ आफ्रीकन फूटबॉलचे (कॅफ) अध्यक्ष पॅट्रीस मोट्सेपे यांनी जाहीर केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
कॅफने इथोपिया, गॅम्बिया, चाड, सिरा लिवन या देशांसोबत गिनीलाही आतंरराष्ट्रीय फूटबॉल सामना आयोजित करण्याची बंदी घातली आहे. या देशाकडे आतंरराष्ट्रीय खेळ आयोजित करण्याएवढी तयारी नाही, असं कॅफने सांगितलं आहे.
त्यामुळे नुकत्याच झालेल्या आफ्रीका कप ऑफ नेशन्स क्वालिफायर्स या स्पर्धेत गिनीने भाग घेतला होता तेव्हा त्यांच्याकडेचे सगळे सामने शेजारच्या आयव्हरी कोस्ट या देशात झाले होते
रविवारी ज्या स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली त्याचं बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. स्टेडियम बांधायला दशकापूर्वी सुरुवात झाली होती.
रविवारी झालेला सामना 2021 मध्ये सत्तापालट करून अंतरिम राष्ट्राध्यक्ष बनललेल्या मामाडी डोऊम्बोया यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता.
हे सामने म्हणाजे बळाचा वापर करून सत्तेवर आलेल्या नेत्याला राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचवण्यासाठी चालवलेल्या मोहिमेचा एक भाग असल्याचं विरोधक म्हणतात.
या भयानक घटनेला सत्तेत असणारे लोक जबाबदार असल्याचा आरोप नॅशनल अलायन्स फॉर चेंज अँड डेमोक्रसी या विरोधी पक्षाने सोमवारी केला. त्यावर सरकारने अजून प्रत्युत्तर दिलेलं नाही.
गिनीतल्या फूटबॉल विश्वातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची गेल्या काही महिन्यात कसून तपासणी करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात फेगीफूटचे अध्यक्ष अबौबाकर साम्पली या तपासणीच्या विखळ्यात सापडले होते. भ्रष्टाचार केल्याचा आणि हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
साम्पली हे एएसके या स्थानिक गटाच्या संचालक मंडळावरही आहेत. तिथेही त्यांच्यावर हिंसाचार घडवून आणल्याचा आणि मिलो एफसी या गटासोबत एएसके सामना हरत असताना पंचांवर दबाव टाकल्याचा आरोप एका कनिष्ठ कर्मचाऱ्यांने केला होता.
शेवटी मिलो एफसी या गटाला खेळ सोडून देऊन मैदानातून असुरक्षितपणे पळ काढावा लागला, अशी नोंद फेगीफूटच्या नैतिक विभागानं केली आहे.
नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने लोकांना नोकरीवर ठेवण्याचेही आरोप साम्पली यांच्यावर झाले आहेत.
हे सगळे आरोप त्यांनी वारंवार धुडकावून लावलेत.