अदानीच्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात सातपट वाढ;
फुरसुंगी-ऊरुळी परिसरात नागरिक संतप्त
अदानीना का पावले मोदी सरकार ?
पुणे :- फुरसुंगी, भेकराईनगर, ऊरुळी देवाची आणि परिसरातील नागरिक सध्या अचानक वाढलेल्या वीजबिलामुळे प्रचंड संतप्त झाले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत. राज्य विद्युत वितरण कंपनीने अदानी कंपनीमार्फत वीजपुरवठ्यासाठी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नवीन मीटर बसवलेल्या घरांमध्ये वीजबिल आधीच्या तुलनेत सहा ते सात पट अधिक आल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
याआधी जेथे महिन्याला ७०० ते १५०० रुपये वीजबिल येत होते, तेथे आता ७००० ते १४००० रुपये पर्यंतचे बिल आले आहे. सध्या मुलांचे शालेय सत्र सुरू असल्यामुळे शैक्षणिक खर्च, वाढलेले वीजबिल आणि महागाई यामुळे सामान्य कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे.
"लाईट बिल भरायचं की पोट भरायचं?"
महावितरण कार्यालयावर धडक देत नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. वेळेवर बिल न भरल्यास वीजजोडणी तोडण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत माजी नगरसेवक गणेश बोरे म्हणाले, “ज्यांना पूर्वी ७०० ते १५०० रुपये बिल येत होते, त्यांना आता ७ हजार ते १४ हजार रुपये बिल येत आहे. कुटुंबाचा मासिक उत्पन्नच जर १० ते १५ हजार रुपये असेल, तर ते लाईट बिल भरून काय खाणार आणि मुलांना कशी शिकवणार? हा गंभीर प्रश्न आहे.”
महावितरणची भूमिका संशयास्पद
महावितरणचे अधिकारी म्हणतात की, जुने मीटर ‘फॉल्टी’ होते म्हणून बिल कमी येत होते. मात्र, हे मीटर नागरिकांनी बाजारातून खरेदी केले नव्हते, तर महावितरणनेच अधिकृतपणे बसवले होते. त्यामुळे ते फॉल्टी होते, हा दावा नागरिक मान्य करत नाहीत.
गणेश बोरे यांनी मागणी केली की, “महावितरणने तातडीने ही परिस्थिती सुधारावी, स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवावी आणि चुकीच्या बिलांचे पुनरावलोकन करावे. यासंदर्भात आम्ही स्थानिक आमदार व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही पाठपुरावा करणार आहोत.”