अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी पैशांची मागणी ; काँग्रेसच्या नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
Raju tapal
October 14, 2021
44
भिवंडीत अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या काँग्रेसचा स्वीकृत नगरसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
भिवंडी शहरातील मौजे कामतघर हद्दीतील महसूल विभागाच्या नावे सर्व्हे क्रमांक 42/अ/3 ही 60 गुंठे जागा आहे .परंतु सदर जागा भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या ताब्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी देण्यात आली होती. परंतु या जागेवर व्यवसायिक गाळे उभारण्यात आले होते. सदर गाळे पालिकेने रस्ता रुंदीकरणात तोडले असता भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून 67 गाळे उभारण्यात आले असून याबाबत काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महानगरपालिका व महसूल विभागाकडे तक्रार करून सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत दुकान मालकांनी मध्यस्थी करून कारवाई न करण्याबाबत विनंती केली असता सिद्धेश्वर कामूर्ती यांनी राजकुमार चव्हाण यांच्याकडे त्यांच्या मालकीचा फार्म हाऊस नावे करून द्यावा अथवा दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली. अखेर 50 लाखात तडजोड झाली. त्याबाबत राजकुमार चव्हाण यांनी लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी सापळा रचून पद्मानगर भाजी मार्केट येथे सिद्धेश्वर कामूर्ती यांना रंगेहाथ पकडले. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.
Share This