बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
Raju tapal
October 19, 2024
57
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट;
सिद्दीकी यांचा पोलीस सुरक्षा रक्षक निलंबित
मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळेच कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या शनिवारी रात्री बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी सोनावणे हेच सिद्दीकींसोबत होते. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, असा दावा सोनावणे यांनी केला आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कालच पोलिसांनी जबाब नोंदवला. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा हा कॉन्स्टेबल कुठे उभा होता? फायरिंग झाल्यावर त्याने काय केलं ? तो घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेतला.
मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. झिशान सिद्गीकी यांनी गेल्या दोन दिवसांत पोलिसांची भेट घेतली होती. या घटनेचे राजकारण करु नका. आम्हाला न्याय हवा, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले होते. आपल्या वडिलांवर गोळीबार होत असताना पोलीस सुरक्षारक्षक काय करत होता, त्याला काहीच कसे करता आले नाही, असा सवाल झिशान यांनीही उपस्थित केला. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सविस्तर जबाब नोंदवला जाणार आहे. दरम्यान बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर बाबा सिद्दिकींचा मुलगा झिशान सिद्दिकी यानं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत एक निवेदन जारी केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांच्या जीवनाचं आणि त्यांच्या घरांचं रक्षण करताना आपले प्राण गमावले. आज माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचं राजकारण केलं जाऊ नये आणि नक्कीच व्यर्थ जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे.
Share This