मारहाण प्रकरणी फोंडाघाट येथील चौघांना जामीन
कणकवली:-फोंडाघाट गडगेसकलवाडी येथील राजेश अशोक कदम याला चिव्याच्या दांड्यानें गंभीर मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट येथील रोहित संतोष पारकर, सागर प्रकाश वाळवे, सचिन श्रीकांत सुतार, ओंकार प्रकाश पवार यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांनी काम पाहिले.
२१ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९.३० ते १०.३० वा.च्या मुदतीत फिर्यादी राजेश कदम याला आरोपी रोहित पारकर याने तुला बलात्काराच्या खटल्यात अडकवतो, अशी धमकी देत हनुमान मंदिर येथे बोलावले. तेथे झालेल्या बाचबाचीत आरोपीनी त्याला शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीने हा प्रकार वाडीतील नितीन म्हाडेश्वर व अभय म्हाडेश्वर यांना सांगितला. हे सर्वजण जाब विचारण्यासाठी गेले असता फोंडाघाट बसस्थानक येथे चारही आरोपींनी फिर्यादी व सोबतच्या साक्षीदारांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात नितीन म्हाडेश्वर याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तसेच फिर्यादी व इतर साक्षीदार यांनाही दुखापती झाल्या. याबाबत भा.न्या.सं. कलम ११५ (१), ११८(२), ११८ (१), ३५१, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने कस्टडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर आरोपींच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणू नये, तसेच अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, अशा अटी घातल्या आहेत.