टिटवाळ्यात बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात
पारंपरिक वेशभूषा, गीत-नृत्याने रंगला कौटुंबिक स्नेह सोहळा
राजू टपाल.
टिटवाळा:- भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि समस्त गोर बंजारा समाज बांधव,टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक तीज महोत्सव व कौटुंबिक स्नेह सोहळा रविवार,३० ऑगस्ट २०२६ रोजी सिद्धिविनायक मंदिर हॉल,टिटवाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. बंजारा समाजाचा पारंपरिक तीज महोत्सव हा पवित्र श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा श्रद्धा,संस्कृती आणि निसर्गाशी घट्ट नाते जोडणारा प्रमुख पारंपरिक सण मानला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून बंजारा समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककला जपण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी बंजारा भगिनींनी पारंपरिक फेटिया व काचळी परिधान करून पारंपरिक गीतांवर तसेच डफडाच्या तालावर आकर्षक नृत्य सादर केले. पारंपरिक गीत-संगीत आणि नृत्यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहमय झाले होते. टिटवाळा परिसरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून नोकरीच्या निमित्ताने मुंबई व परिसरात स्थायिक झालेले अनेक बंजारा समाजबांधव राहतात. समाजबांधवांकडून गेल्या अनेक वर्षांपासून तीज उत्सवाची परंपरा जपली जात आहे. यंदाचा तीज महोत्सव विसर्जन व कौटुंबिक स्नेह सोहळा सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार मेहरबान राठोड (IPS), माजी उपमहापौर तथा केडीएमसीच्या नगरसेविका उपेक्षाताई भोईर,नगरसेवक बंदेश जाधव,माजी नगरसेवक मयुर पाटील,शक्तिवान भोईर,भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था महाराष्ट्र राज्याचे सचिव अनिल राठोड तसेच कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सरला काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करत तीज महोत्सवास शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजाच्या पारंपरिक गीत व नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. तीज महोत्सव व विसर्जन सोहळा यशस्वी करण्यासाठी नायक जयसिंग राठोड, कारभारी संतोष चव्हाण तसेच समस्त बंजारा समाजबांधवांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या माध्यमातून बंजारा समाजाची संस्कृती,परंपरा आणि एकतेचे दर्शन घडले.