भातकुली तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न
भातकुली :- पंचायत समिती भातकुली आणि भातकुली तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा राष्ट्रीय शेतकी विद्यालय,खोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती भातकुलीचे गटशिक्षणाधिकारी प्रेरक उजगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय शेतकी विद्यालय, खोलापूरचे मुख्याध्यापक गजानन मानकर उपस्थित होते. यावेळी भातकुली तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष गोपाल वडतकर,उपाध्यक्ष संगीता येवतीकर,अमरावती जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे सचिव गेडाम सर तसेच पर्यवेक्षक मंचावर उपस्थित होते. ‘भारतीय ऊर्जाक्षेत्र २०४७ : संधी आणि आव्हाने’ या विषयावर तालुक्यातील १७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपले विचार व मते प्रभावीपणे मांडली. या स्पर्धेत छोगलाल राठी गुरुकुल विद्यालय,भातकुलीचा श्रवण इंगोले याने प्रथम क्रमांक पटकावला. श्री शिवाजी हायस्कूल,खारतळेगावचा समर्थ मुंदाने याने द्वितीय,तर पंजाबराव कुचे विद्यालय,विर्शी येथील कु.उन्नती चतुर हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे परीक्षण जे. डी. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. हिमांशू जयस्वाल आणि डॉ. निलेश किस्वे यांनी केले. नवनिर्वाचित मुख्याध्यापक म्हणून गोपाल वडतकर यांचा विज्ञान मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भारती देशमुख आणि निलेश चाफलेकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वडतकर सर यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील विज्ञान शिक्षक तसेच केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.