रिलायन्स फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकारने राज्यात छोट्या मुलांचे संगोपन आणि शिक्षण व्यापक करण्यासाठी विशेष शिक्षण केंद्रे व प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत.
यात प्रामुख्याने हसत खेळत शिक्षण तंत्रामार्फत ७०० अंगणवाडी कर्मचारी व निरीक्षक यांच्या माध्यमातून दहा हजार मुलांना यांचा फायदा मिळवून दिला जाईल.
या दिशेने महत्वाचे पाऊल म्हणून ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील रायते येथे अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळांच्या साखळीचे उद्घाटन करण्यात आले.
या अशा २४ अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळा साखळीमुळे शिक्षण, नवकल्पना, प्रात्यक्षिके याआधारे शिकवणे आणि शिकणे याबाबत उपयुक्त वातावरण निर्माण करण्याचे रिलायन्स फाउंडेशनचे ध्येय आहे. तीन ते सहा वर्षांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले जाते.
या कार्यक्रमाला अडीचशे पालक, बालके तसेच एकात्मिक बालविकास सेवेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी यासंदर्भातील आपल्या महत्वाकांक्षा व संकल्पना सांगितल्या.
राज्यात छोट्या मुलांचे शालेयपूर्व संगोपन आणि शिक्षणक्षेत्र व्यापक करण्याचे रिलायन्स फाउंडेशनचे ध्येय आहे. या भागीदारीतून रिलायन्स फाउंडेशन, प्रायोगिक तत्त्वावर अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळाही निर्माण करणार आहे. यातून शिक्षण, नवकल्पना, प्रात्यक्षिके यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
अंगणवाडी कर्मचारी लहान मुलांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच लहान मुलांच्या विकासात पालकांची व त्यातही मातेची महत्त्वाची भूमिकाही ते जाणतात. या कार्यक्रमाद्वारे या सेवकांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारसह भागीदारी करण्यात आम्हाला आनंद होत आहे. अंगणवाडी शिक्षण प्रयोगशाळांची निर्मिती हे त्यासाठी महत्वाचे पाऊल आहे. या मोहिमेत रिलायन्स फाउंडेशन यापुढेही महाराष्ट्र सरकारसह काम करत राहील, असे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.
महाराष्ट्राच्या एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारे यासंदर्भात म्हणाले की, या भागीदारीतून रिलायन्स फाउंडेशनच्या संसाधनांचा आणि ज्ञानाचा उपयोग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी होईल. राज्यात छोट्या मुलांच्या शालेयपूर्व संगोपनाचा आणि शिक्षणाचा दर्जाही यामुळे वाढेल. तसेच त्यामुळे मुलांच्या भविष्याचा पायाही घातला जाईल.
हसत खेळत शिक्षण या संकल्पनेबाबत सातशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची व निरिक्षकांची क्षमतावाढ करण्याचा प्रयत्न रिलायन्स फाउंडेशन या मोहीमेद्वारे करेल. तसेच बालविकासासाठी पालकांचा व समाजाचा सहभाग घेण्यावरही भर दिला जाईल. सक्षम अंगणवाड्यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या अंगणवाड्यांमध्ये मुलांच्या वयानुसार पुस्तके, डिजिटल शैक्षणिक साहित्य पुरवले जाईल. यामुळे मुलांची शाळेत जाण्याची पूर्ण तयारी होईल व त्यांच्या शैक्षणिक कौशल्यातही वाढ होईल तसेच त्यांना आपल्या क्षमता पूर्णपणे वापरण्याची संधी मिळेल. या शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचा फायदा दहा हजार मुलांना होईल. देशात तळागाळातील एक कोटी मुलांना जागतिक दर्जाचे शालेय पूर्व शिक्षण देण्याच्या रिलायन्स फाउंडेशनच्या उद्दीष्टाशी ही मोहीम सुसंगत आहे. यासाठी रिलायन्स फाउंडेशन अनेक राज्य सरकारांबरोबर काम करत आहे.