जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘स्वच्छ गाव,सुरक्षित जलवायू’ मोहिमेला प्रारंभ
मिशन लाईफच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश; घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
ठाणे:- जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत १ जून ते ५ जून २०२६ या कालावधीत “स्वच्छ गाव,सुरक्षित जलवायू” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास, कचरा व्यवस्थापन आणि जनसहभाग यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद ठाणेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत देण्यात आली. यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “हवामान कृती” (Climate Action) अशी असून त्याअनुषंगाने मिशन लाईफ (Lifestyle for Environment) बाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. पर्यावरण,वन व हवामान बदल मंत्रालय तसेच पेयजल व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ग्रामीण भागात विविध लोकसहभागात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी 4Rs अर्थात Refuse,Reduce,Reuse आणि Recycle या संकल्पनांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच पाणी व्यवस्थापनासाठी 3Rs (Reduce,Reuse,Recharge),परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy) आणि “कचऱ्यापासून संपत्ती” (Waste to Wealth) या संकल्पनांचा प्रसार करण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन (SWM) नियम २०२६ अंतर्गत कचऱ्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ग्रामपंचायती,स्थानिक संस्था आणि संबंधित घटकांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतींना Bulk Waste Generators (BWGs) यांची नोंदणी करणे, चार प्रकारांमध्ये स्रोतस्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण (Four-Stream Source Segregation) करणे, जुन्या कचरा साठ्यांचे (Legacy Waste) व्यवस्थापन करणे, तसेच सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमार्फत गावांमध्ये स्वच्छता अभियान,जनजागृती रॅली,विशेष ग्रामसभा,स्वच्छता शपथ,वृक्षारोपण,कचरा वर्गीकरण प्रात्यक्षिके, प्लास्टिकमुक्ती अभियान तसेच मिशन लाईफ विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छता सुविधांची योग्य देखभाल,समुदायाचा सक्रिय सहभाग आणि ODF Plus Model गाव संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी यावरही विशेष भर दिला जाणार आहे. ५ जून रोजी आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये मोहिमेतील उपलब्धी, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती, स्थानिक कृती आराखडा तसेच पुढील अंमलबजावणीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती पंचायत राज मंत्रालयाच्या निर्धारित प्रणाली तसेच SBM(G)-IMIS पोर्टलवर नोंदविण्यात येणार आहे. “स्वच्छ गाव,सुरक्षित जलवायू” ही केवळ मोहीम नसून पर्यावरण संवर्धनासाठीचा लोकसहभागाचा व्यापक उपक्रम आहे. नागरिक,ग्रामपंचायती,स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवून स्वच्छ,सुंदर आणि पर्यावरणपूरक गावांच्या निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. “पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता या एकमेकांशी निगडित बाबी आहेत. मिशन लाईफच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही काळाची गरज आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी,कचरा वर्गीकरण,पुनर्वापर आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत गावांची निर्मिती करणे हे आपले सामूहिक उद्दिष्ट आहे. जिल्हा परिषद ठाणे या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहे,”मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव