शिक्रापूरमध्ये वृक्षारोपणातून वटपौर्णिमा साजरी
पूजाताई भुजबळ यांचा महिलांना वृक्षसंवर्धनाचा संदेश
पुणे :-परंपरा आणि पर्यावरण यांचा सुंदर मेळ घालत शिक्रापूरमध्ये यंदा वटपौर्णिमा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात आली. शिक्रापूरच्या माजी उपसरपंच,राष्ट्रवादी काँग्रेस शरश्चंद्र पवार गट पक्षाच्या शिरूर तालुका महिलाध्यक्षा पूजाताई भुजबळ यांच्या पुढाकारातून गावातील विविध ठिकाणी वडाच्या झाडांची रोपे वाटप करून त्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन करून वृक्षसंवर्धनाची शपथ घेत वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी महिलांना वृक्षारोपणाचे महत्त्व,पर्यावरण संवर्धनाची गरज आणि भावी पिढ्यांसाठी वृक्षांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. केवळ परंपरा जपण्यापुरते न थांबता ती पर्यावरणाशी जोडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. माजी उपसरपंच,राष्ट्रवादी काँग्रेस शरश्चंद्र पवार गट पक्षाच्या शिरूर तालुका महिलाध्यक्षा पूजाताई भुजबळ यांनी सांगितले,"वटपौर्णिमा हा सण केवळ पूजेपुरता मर्यादित न राहता प्रत्येक महिलेने एक वडाचे झाड लावून त्याचे संगोपन केले तर पर्यावरण संवर्धनासाठी मोठे योगदान मिळू शकते. परंपरा जपत पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजची काळाची गरज आहे."
ग्रामस्थ आणि महिलांनी या उपक्रमाचे स्वागत केले. धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संरक्षण यांची सांगड घालणारा हा उपक्रम शिक्रापूरमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला असून,अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.