सत्ताधारी शिवसेना आणि भाजप विरोधात काँग्रेसची निदर्शने
ठाणे - ठाणे महापालिकेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपली आहे.मात्र यामुळे विकासकामे खोळंबली असून जनता यात भरडली जात आहे.महासभेत सत्त्ताधाऱ्यांनी केलेल्या गोंधळाचा निषेध करण्यासाठी आज ठाणे काँग्रेसच्या वतीने पालिका मुख्यालयासमोर शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.मागील आठवड्यात झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात चकमक उडून महासभा आटोपण्यात आली. तब्बल तिन वर्षांनी ठाणे महापालिकेचे सभागृह अस्तित्वात आले आहे. प्रशासकीय कारकिर्दीत सर्वसामान्य ठाणेकरांची कामे खोळंबली होती असा लोकप्रतिनिधींचा आरोप होता. मात्र आता सभागृह स्थापन झाल्यानंतर लोकांची कामे करण्याचे सोडून,प्रश्नांवर चर्चा करायचे सोडून शिवसेना व भाजपा हे भांडण्याचे नाटक करत पाच मिनिटात विषय मंजूर करत असल्याची टिका विक्रांत चव्हाण यांनी केली. सत्ताधाऱ्यांच्या या खेळी मुळे नविन नगरसेवकांना चर्चा करता येत नाही. आपल्या प्रभागातील विषय मांडता येत नाही.आज स्थायी समिती,विशेष समिती,प्रभाग समित्या अजून स्थापन झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा अशाच प्रकारे भोंगळ कारभार सुरु असून विकासाला खीळ बसली आहे. याच कारणांमुळे आज काँग्रेसने हिंदी चिनी भाई - भाई, भाजपा-शिवसेना मिलके खाई अशा घोषणा देत आंदोलन केल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली.आंदोलनानंतर विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त रोडे यांना निवेदन दिले.सभागृहात घाईघाईने मंजूर केलेल्या विषयांमध्ये त्रुटी असल्याने सखोल अभ्यास करुन पुन्हा ते विषय महासभेत आणावे किंवा ते विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवावे,अशी मागणी निवेदनात केल्याची माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली. शिष्टमंडळात भालचंद्र महाडिक,निशिकांत कोळी,शैलेश घरत,उमेश कांबळे,वैशाली भोसले,स्वनिल कोळी,सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.