टिटवाळा पूर्व येथे ५ सप्टेंबरला दहीहंडी उत्सवाचा जल्लोष
निलेश भाई जाधव प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन
राजू टपाल.
टिटवाळा:- मांडा टिटवाळा (पूर्व) परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने निलेश भाई जाधव प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार,५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मांडा टिटवाळा (पूर्व) येथील पटेल मार्टच्या बाजूला,गणेश मंदिर रोड येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात गोविंदा पथकांकडून उंचच उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा थरार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह लहान-मोठ्या गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे उपस्थित राहणार असून,त्यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दहीहंडीच्या माध्यमातून परंपरा,संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या भव्य उत्सवाच्या आयोजनासाठी भावेश जाधव,किशोर राठोड आणि भुपेश जाधव यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे.