दौंड शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ ; तीन घरांवर दरोडे टाकून दोन ठिकाणी घरफोडी
दौंड शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून तीन ठिकाणी दरोडे टाकून दोन ठिकाणी घरफोडी केल्याची घटना घडली.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अण्णासाहेब देशमुख यांच्यावर त्यांच्याच घरात वार करण्यात आले असून अन्य ठिकाणी चोरीचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला आहे.
१६ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यरात्री दाट लोकवस्तीच्या भागात हे दरोडे टाकण्यात आले.
दौंड -गोपाळवाडी रस्त्यालगत भवानीनगर येथे दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अण्णासाहेब देशमुख यांच्या बंंगल्यात दरोडेखोरांनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लोखंडी व लाकडी दार उचकटून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी अण्णासाहेब देशमुख यांच्या ओठावर व दातांवर धारदार शस्त्राने वार करण्याबरोबरच पाठीवर रॉडने मारून त्यांना जखमी केले. शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसुत्र व कानातील दागिने व मुलांच्या पायातील चांदीच्या वाळ्या हिसकावून घेत कपाटातील व पाकिटातील रोख सत्तर हजार रूपये काढून दरोडेखोरांनी पोबारा केला.
अण्णासाहेब देशमुख ओठ व दाताखालच्या भागात एकूण दहा टाके पडले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
गजानन सोसायटी येथील कमल सुरेश तुपेकर यांच्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री दोन वाजता दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. पर्समधील रोख सहा हजार रूपये व चांदीचे पैंजण नेले.
कमल तुपेकर व वनिता सुरेश तुपेकर यांचे तोंड दरोडेखोरांनी दाबले होते.
तोंड दाबताच वनिता तुपेकर यांनी प्रतिकार केला.त्यादरम्यान विजेचा दिवा बंद झाल्याने दरोडेखोर पळून गेले.
सरपंच वस्ती शेजारील ढमे वस्ती येथे पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान किशोर दत्तात्रय ढमे यांच्या बंगल्यात स्वयंपाक घराचे दार उचकटून दरोडेखोरांनी प्रवेश केला. सोन्याचे दीड तोळ्याचे दागिने रोख साडेसहा हजार रूपये घेवून दरोडेखोरांनी पोबारा केला.