• Total Visitor ( 84303 )

एकनाथ शिंदेंची नेहमी पाठराखण करणारे दिपक केसरकरांचे अखेर मंत्रीपद हुकले

Raju tapal December 17, 2024 6

एकनाथ शिंदेंची नेहमी पाठराखण करणारे दिपक केसरकरांचे अखेर मंत्रीपद हुकले

सिंधुदुर्ग:- महायुतीच्या नव्या सरकारमध्ये तळ कोकणातील म्हणजेच सिंधुदुर्गातील शांत आणि संयमी चेहरा म्हणून ओळखले जाणारे दीपक केसरकर यांची वर्णी लागता लागता राहीली अन् ऐनवेळी त्यांचे मंत्रिपद हुकले.

मागच्या मंत्रिमंडळात ते शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहत होते. त्यांनी त्यांचे काम चोखपणे बजावले होते पण यावेळी त्यांची संधी का हुकली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. केसरकर हे धोरणी राजकारणी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते.सावंतवाडी शहरातील एका घरंदाज श्रीमंत कुटुंबात दीपक केसरकर यांचा जन्म झाला.. नगरसेवक, नगराध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द आहे. एक सुस्वाभावी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी सावंतवाडी शहर आणि परिसरात स्वतःचा नावलौकिक केला.

2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढले आणि विजयी झाले. आपल्या राजकीय वाटचालीत सुमारे पंधरा वर्षांपूर्वी केसरकर यांना नारायण राणे यांच्याशी संघर्ष करावा लागला आणि शिवसेनेच्या संघटनेची त्यांना साथ मिळत गेली. केसरकर यांचा राणेंना असलेला विरोध शमवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खूप प्रयत्न केले. पण केसरकर नमले नाहीत. आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले.देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लावली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील केसरकर यांच्याकडे चालून आले.अर्थराज्यमंत्री म्हणून त्यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प देखील सादर केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला. मात्र महाविकास आघाडीच्या राजकारणात मंत्रिपदी त्यांची वर्णी लागू शकली नाही.

2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उलटफेर केला. तेव्हा शिंदे आणि ठाकरे यांच्यात सलोखा घडवून आणण्याचे प्रयत्न केसरकर यांनी केले. पण तो योग काही जुळून आला नाही आणि अखेर स्वतः केसरकर एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रवक्तेपदी केसरकर यांची नियुक्ती करून टाकली. ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थित सांभाळली. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रीपदी आणि मुंबई शहरच्या पालकमंत्री पदी केसरकर यांची नियुक्ती शिंदे यांनी केली.

मोती तलावाचे सौंदर्यीकरण

सौंदर्यदृष्टी हा केसरकर यांचा अनुकरणीय गुण आहे. सावंतवाडी शहराच्या मध्यभागी असलेल्या मोती तलावाचे ज्या पद्धतीने सुशोभीकरण आणि विकास त्यांनी केला आहे तो पाहण्यासारखा आहे. वेंगुर्ले बंदर आणि नवाबागचा किनारा यांना जोडणारा झुलता पूल देखील केसरकर यांनी आपल्या मतदारसंघाला दिलेली मोठी देणगी आहे. हजारो पर्यटक दररोज झुरत्या पुलावर येऊन वेंगुर्ले शहरातील मनोहरी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत असतात.तर या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना रोजगाराची उपलब्ध झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी या गावी एमआयडीसी झाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांनी उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीत आपले प्रकल्प उभारण्यासाठी आवाहन केले. दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्यातून सावंतवाडी येथे देखणे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे तसेच दोडामार्ग येथेही क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. केसरकर यांच्या प्रयत्नातूनच वेंगुर्ले येथे पाणबुडी प्रकल्प येत आहे.

दीपक केसरकर चौथ्यांदा विधानसभेत, मात्र यंदा मंत्रीपदाची संधी हुकली

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत केसरकर यांनी राणे यांच्याशी चांगले जुळवून घेतले. नारायण राणे यांचा लोकसभेसाठी अर्ज दाखल करताना तसेच राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश यांचे विधानसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताना केसरकर सोबत उपस्थित होते. केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी उबाठा गटात प्रवेश करून उमेदवारी घेतली होती मात्र केसरकर यांनी त्यांचा आणि चाळीस हजार मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला. मात्र यावेळी त्यांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले, त्यांची मंत्रिपदाची संधी फडणवीस सरकारमध्ये हुकली आहे.

Share This

titwala-news

Advertisement