पत्रकार सुरेश वाणी यांना कथित धमकीप्रकरणी चौकशीची मागणी
रायगड (राकेश खराडे):- जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथे पत्रकार सुरेश वाणी यांच्याशी आमदार शरद सोनवणे यांनी कथितरीत्या अर्वाच्च भाषेत वक्तव्य करून धमकी दिल्याच्या घटनेची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले,रायगड जिल्हाधिकारी,रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अजनावळे येथील आश्रमशाळेत अदानी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची बैठक सुरू असताना पत्रकार सुरेश वाणी हे पत्रकार म्हणून बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी किल्ले शिवनेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी वाणी यांच्याशी अर्वाच्च भाषेत वक्तव्य करून,“१५ ऑगस्ट होऊ द्या...माझ्यावर याआधी भरपूर गुन्हे आहेत. वाणी,तुमच्याकडे बघून घेतो,”अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच पत्रकारांविषयी “पत्रकारांचे धंदे झाले आहेत,”अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप असून,या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हा जनतेच्या समस्या,प्रश्न आणि अन्याय शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे, जनतेच्या समस्या मांडणे आणि वस्तुस्थिती समाजासमोर आणणे ही पत्रकारांची लोकशाहीतील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे पत्रकारांना धमकावणे अथवा त्यांच्या कार्यात अडथळा आणण्याचा कोणताही प्रकार गंभीरपणे घेतला पाहिजे,अशी भूमिका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने मांडली. या कथित घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तीव्र व जाहीर निषेध करण्यात आला असून,घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही,असेही संघटनेने स्पष्ट केले. दरम्यान,पत्रकारांच्या सन्मान,स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेच्या संरक्षणासाठी सरकार पत्रकारांच्या पाठीशी राहील,असे आश्वासन रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष राकेश खराडे,कोकण विभाग प्रदेश उपाध्यक्ष शैलेश पालकर,राहुल जाधव,अर्जुन कदम,प्रसाद अटक,संतोष घरटकर,सुरेश शिंदे,किरण बांधणकर,प्रशांत पोतदार,किरण मोरे,सुधीर पांढरे,सुरेश पंधेरे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.