आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही;
स्वारगेट घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजितदादांकडून संताप व्यक्त
पुणे :- स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी पहाटे झालेली घटना पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीला अटक झाली असून त्याला कठोर शासन होईल असे आश्वासन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही असे म्हणत अजितदादांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेबाबत सर्व संबधितांची बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करू असे सांगितले. अजित पवार म्हणाले, मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत. मिसाळ यांनी सांगितले की, परगावी असल्यामुळे घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांबरोबर बोलले. त्यांना सखोल तपास करण्याविषयी सांगितले. आरोपीला अटक झाल्याचे समजले. पोलिस आता पुढील कार्यवाही करतील. दरम्यान स्वारगेट तसेच अन्य बसस्थानकांमधील सुरक्षेविषयी, त्यातही प्रामुख्याने रात्रीच्या वेळी, पहाटे महिलांच्या सुरक्षेविषयी काय उपाययोजना करता येतील याविषयी सर्व संबधितांची बैठक घेऊ. त्यात यावर चर्चा करून निश्चित होतील ते उपाय त्वरीत अमलात आणले जातील.