शहापूर तालुक्यात ८४.१३ टक्के मतदारांचे डिजिटलायझेशन पूर्ण
विवेक कांबळे.
शहापूर:- मतदार याद्या अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेने शहापूर तालुक्यात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. तालुक्यातील एकूण २ लाख ९८ हजार ७३६ मतदारांपैकी २ लाख ५१ हजार ३४१ मतदारांचे,म्हणजेच ८४.१३ टक्के मतदारांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ४७ हजार ३९५ मतदारांच्या (१५.८७ टक्के) नोंदींची पडताळणी सुरू असून,मतदार घरी उपलब्ध नसणे,स्थलांतर,मृत्यू,पत्त्यातील बदल किंवा नोंदींमधील त्रुटी आदी कारणांमुळे प्रलंबित असलेल्या नोंदींची पुढील टप्प्यात कारणनिहाय छाननी करण्यात येणार आहे.
या मोहिमेत पात्र मतदारांची नावे कायम ठेवण्याबरोबरच मृत,स्थलांतरित किंवा चुकीच्या नोंदींची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या मतदार यादीचे २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे जुन्या नोंदींची पडताळणी होऊन मतदार यादी अधिक अचूक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. दरम्यान,३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, त्यानंतर नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव,पत्ता तसेच इतर तपशील तपासून घ्यावेत आणि काही त्रुटी आढळल्यास वेळेत दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहापूर तालुक्यातील ८४.१३ टक्के मतदारांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून,उर्वरित नोंदींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तालुक्याची मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह होईल,असे शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी स्पष्ट केले.