• Total Visitor ( 560728 )
News photo

नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

Raju Tapal publisher June 02, 2026 21

नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभाग सज्ज



पूर,अतिवृष्टी व साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी विशेष कृती आराखडा तयार



ठाणे:- आगामी पावसाळी हंगामात संभाव्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२६-२७ साठी सविस्तर आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार केला आहे. पूरस्थिती,अतिवृष्टी,साथीचे रोग,जलजन्य आजार तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तर,तालुकास्तर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियंत्रण कक्ष,भरारी पथके आणि विशेष वैद्यकीय पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद देण्यासाठी जिल्ह्यात एकूण तीन RRT पथके,वाहन व्यवस्थेसह २४ तास सज्ज ठेवण्यात आली असून,त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टरांचे विशेष प्रतिसाद पथकही कार्यरत करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये,असे निर्देश देण्यात आले आहेत. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावस्तरावर नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. ग्रामपंचायती मार्फत जलजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांना पाणी उकळून व गाळून पिण्याबाबत जनजागृती करण्यात येत असून,पिण्याच्या पाण्याचे नमुने नियमितपणे तपासणीसाठी प्रयोगशाळांकडे पाठविण्यात येणार आहेत. पाणी शुद्धीकरण आणि जलस्रोतांची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला आहे. अतिसार,विषमज्वर,कावीळ,मलेरिया,डेंग्यू,लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या पावसाळ्यात साथीच्या उद्भवणाऱ्या आजारांच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन आवश्यक औषधसाठा,इंजेक्शन्स,आपत्कालीन साहित्य तसेच वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साथ नियंत्रण कक्ष तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून,रुग्णवाहिका,वैद्यकीय पथके,प्रथमोपचार साहित्य आणि मेडिसिन किट सज्ज ठेवण्यात आले आहेत. पूरस्थिती किंवा आपत्तीच्या काळात प्रभावित भागांमध्ये तात्काळ आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्ती काळातील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून नियमित अहवाल जिल्हास्तरावर सादर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गर्भवती माता, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गरज असलेल्या नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. मान्सून कालावधीत संपर्क तुटणाऱ्या गाव-पाड्यातील आशा सेविकेकडे आवश्यक पुरेसा औषधसाठा ठेवण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.  “नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक मनुष्यबळ,औषधसाठा, नियंत्रण कक्ष, वैद्यकीय पथके आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या असून नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement