एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दक्ष राहावे
कृषी विभागाकडून विविध उपाययोजनांचे आवाहन
ठाणे:- प्रशांत महासागरातील (Pacific Ocean) हवामानातील नैसर्गिक बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’ परिस्थितीचा परिणाम देशातील मान्सून पावसावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेती पद्धतीत आवश्यक बदल करावेत,असे आवाहन जिल्हा परिषद ठाणे कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे,पाऊस उशिरा सुरू होणे,पावसामध्ये खंड पडणे तसेच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा परिणाम शेती उत्पादनावर होऊ नये यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या तसेच कमी पाण्यात तग धरणाऱ्या भाताच्या हळव्या वाणांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.यामध्ये कर्जत-३ आणि रत्नागिरी-८ या वाणांचा विशेष समावेश आहे.तसेच किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये,असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.पाण्याची बचत आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यासाठी एसआरटी पद्धतीने भात लागवड,टोकण पद्धतीने लागवड तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात येत आहे. डोंगर उतारावर आडवी नांगरणी करणे,सलग समतल चर तयार करणे,विहिरी व बोअरिंगचे पुनर्भरण करणे तसेच शेततळे व बंधाऱ्यांद्वारे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फळबागांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर,मसाल्याच्या पिकांची आंतरलागवड आणि प्लास्टिक आच्छादनाचा वापर करून पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यावरही कृषी विभागाने भर दिला आहे.जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर धैंचा या हिरवळीच्या खताच्या पिकाचे बियाणे तसेच बांधावर लागवडीसाठी तुरीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.पावसाचा खंड पडल्यास १ टक्के युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट खताची फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर,सेंद्रिय व जैविक खतांचा अवलंब तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.युरियाला पर्याय म्हणून अमोनियम सल्फेट,सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया फॉस्फेट यांसारख्या खतांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठामार्फत परिस्थितीनुसार वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार असून,शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय अॅपचा वापर करून हवामान आधारित सल्ला घ्यावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.एल निनो परिस्थितीत शेतकऱ्यांनी वैज्ञानिक शेती पद्धतींचा अवलंब करून नियोजनबद्ध शेती करणे आवश्यक असून,उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर केल्यास संभाव्य नुकसान कमी करता येऊ शकते, असे कृषी विकास अधिकारी एम.एम.बाचोटीकर यांनी सांगितले.