टिटवाळ्यात फटाके दुकानदारांनी मारले केडीएमसीच्या नियमांना फाट्यावर...
भर मानवी वस्तीत लावलेत मनमर्जी प्रमाणे फटाके स्टॉल
दिवाळीनिमित्त फटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्टॉलना परवानगी!
केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयाकडून ८ बाय ८ फुटांच्या जागेत स्टॉल उभारण्यास मंजुरी; १९ अटी व शर्तींचे पालन बंधनकारक
राजू टपाल
टिटवाळा :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर टिटवाळ्यात फटाक्यांची किरकोळ विक्री करण्यासाठी तात्पुरते मंडप व स्टॉल उभारण्यास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात प्रभाग कार्यालयाने संबंधित अर्जदाराला अधिकृत परवानगीपत्र दिले आहे. मिळालेल्या परवानगीपत्रानुसार,टिटवाळा पूर्व येथील जुन्या अग्निशमन केंद्राजवळील महापालिकेच्या मैदानात ८ बाय ८ फूट म्हणजेच ६४ चौरस फुटांच्या जागेत तात्पुरता मंडप किंवा स्टॉल उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही परवानगी ४ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी देण्यात आली आहे. या परवानगीसोबत महापालिकेने तब्बल १९ अटी व शर्ती लागू केल्या आहेत. स्टॉल लावताना वाहतुकीला किंवा नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा होणार नाही,याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. तसेच रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण होणार नाही,याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फटाका विक्रीसाठी आवश्यक असलेली परवानगी व सुरक्षा नियमांचे पालन करणे,अग्निसुरक्षेची योग्य व्यवस्था ठेवणे,परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे,सुरक्षारक्षक नेमणे तसेच स्वच्छता राखणे या बाबींवरही विशेष भर देण्यात आला आहे. स्टॉल परिसरात कचरा साचू नये यासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय,धार्मिक भावना दुखावणारे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कोणतेही कृत्य करू नये,ध्वनिप्रदूषण टाळावे,तसेच महापालिका व शासनाच्या सूचनांचे पालन करावे,असेही स्पष्ट करण्यात आले आहे. परवानगीच्या अटींचा भंग झाल्यास परवानगी रद्द करण्यासह दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे. सदर परवानगीपत्रावर ‘अ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या प्र. सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांची स्वाक्षरी आहे. दिवाळीच्या काळात फटाक्यांची विक्री करताना नागरिकांची सुरक्षितता,वाहतुकीची शिस्त आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने महापालिकेने या अटी घातल्या आहेत.सदरील फटाके विक्रीसाठी तब्बल 61 जणांनी अर्ज केले असून त्यामध्ये फक्त 21 जणांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती हाती आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने कौस्तुभ गुजरे,जितेंद्र भोईर,उल्हास देशमुख,सचिन माने,गणेश जाधव, भटू अनिल पाटील,दिनेश निकम,सुनील ठोंबरे,सचिन पाटील,रावसाहेब पगारे,नितेश दराडे,अभिषेक खिसमतराव,प्रज्वल पवार,संदीप पंडित,राजू जाधव,प्रवीण पटेल,निकेश पाटील,सुहास माने,अश्विन डवले यांना परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र या सर्वांनी निमकर नाका व अन्यत्र दुकाने लावल्याने महापालिकेच्या अटी नियम शर्तींचा भंग केलेला आहे. तर काही दुकाने भर नागरी वस्तीत लावली गेली असल्याने यदाकदाचित एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. पाहणी केलेल्या ठिकाणी दुकानदारांनी पाठ फिरवली.
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांनी टिटवाळा मंदिर रोडवरील डीजी वन परिसरातील मिश्रा कंपाऊंड,तसेच अग्निशमन केंद्राच्या पाठीमागील महापालिकेच्या जागेची पाहणी केली होती.मात्र त्याआधीच दुकानदारांनी फटाके स्टॉल लावल्याने महापालिकेच्या नियमांना फाट्यावर मारले असल्याची चर्चा टिटवाळा परिसरात आहे.