निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करावा
ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे
ठाणे :-राज्य शासकीय सेवानिवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी सन २०२६-२०२७ साठी आपले हयातीचे दाखले ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी सादर करावेत,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून पुढीलपैकी कोणत्याही एका मार्गाने तो सादर करता येईल:
• बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष स्वाक्षरी: आपले निवृत्तीवेतन खाते असलेल्या मूळ बँक शाखेत प्रत्यक्ष जाऊन बँक अधिकाऱ्यांसमक्ष हयात दाखल्याच्या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करून दाखला नोंदवता येईल.
• ‘जीवनप्रमाण’ संकेतस्थळ: निवृत्तीवेतनधारक https://jeevanpramaan.gov.in या अधिकृत पोर्टलवरून बायोमेट्रिक किंवा प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन हयात दाखला सादर करू शकतात.
• मोबाईल ॲपद्वारे नोंदणी: अँड्रॉइड (Android) अथवा आयओएस (iOS) स्मार्टफोनवर ‘Jeevan Pramaan’ ॲप डाऊनलोड करून घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
• पोस्ट विभागाची घरपोच सेवा: भारतीय डाक विभागाच्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक’ (IPPB) मार्फत पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरपोच डिजिटल हयातीचा दाखला (DLC) सशुल्क नोंदवता येईल.
• जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करणे: विहित नमुन्यातील हयातीच्या प्रमाणपत्रावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याची (Gazetted Officer) स्वाक्षरी घेऊन ते जिल्हा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष सादर करता येईल.
• परदेशातील निवृत्तीवेतनधारकांसाठी: काही कारणास्तव परदेशात वास्तव्यास असणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना तेथील भारतीय दूतावासाच्या (Embassy/Consulate) अधिकृत अधिकाऱ्यांमार्फत प्रमाणित करून दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पाठवता येईल. वेळेत हयातीचा दाखला सादर न केल्यास निवृत्तीवेतन वितरणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी दाखला सादर करावा,असे आवाहन कोषागार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.