घरगुती वापराच्या गॅस टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस भरून त्याची विक्री करणा-या चौघांना शिरूर पोलीसांनी अटक केली.
अमोल निवृत्ती फुलसुंदर वय ३९ रा.मलठण ता.शिरूर ,मल्लप्पा आमोशिद नरवटे वय - ३४, बसवराज लक्ष्मण नानाजे वय -३० वर्षे, सिद्धाराम विठ्ठल बिराजदार वय -३१ वर्षे सर्वाजण रा पारीजात बंगल्यामागे मांगडेवाडी कात्रज पुणे अशी अटक केलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत.
शिरूर तालुक्यातील मलठण येथील शेतात निळ्या कापडाचा आडोसा करून घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून कमर्शियल व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये पिन कनेक्टरच्या साहाय्याने बेकायदेशीर गॅस भरून चढ्या दराने विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी छापा टाकल्यानंतर चौघे आरोपी घरगुती गॅस सिलेंडर टाक्यांमधून कमर्शियल व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये पिन कनेक्टरच्या साहाय्याने मानवी जिवितास धोका होईल अशा रितीने बेकायदेशीरपणे भरत असताना मिळून आले.
त्यांच्या ताब्यातील भारत गॅस च्या ८० टाक्या, एच पी गॅसच्या १०० टाक्या कमर्शियल व्यावसायिक ९३ टाक्या, छोट्या ३ टाक्या, ४० पीन, १ इलेक्ट्रॉनिक वजन काटा, गरम पाणी करण्याकरता वापरावयाच्या २ लोखंडी टाक्या, दोन भट्टी शेगडी, १ लायटर एम एच १४ ए झेड ५२८१ या क्रमांकाची महिंद्रा पिक अप, एम एच १४ सी पी १३१५ या क्रमांकाची महिंद्रा जेनैयू असा एकूण ११ लाख ४६५० रूपयांचा माल मिळून आला.
सहाय्यक फौजदार नजीम उस्मान पठाण यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत अधिक तपास करीत आहेत.