लोणीकंद येथे गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे भव्य आयोजन
फुलगाव(गौतम पाटोळे):- लोणीकंद येथील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच भारतीय आणि महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेचे जतन व्हावे, या उद्देशाने गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा सरचिटणीस तथा लोणीकंद ग्रामपंचायतीचे सदस्य गौरव राजाराम झुरुंगे यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा लोणीकंद गावातील सर्व ६ वॉर्डमध्ये घेण्यात येणार असून, प्रत्येक वॉर्डमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे तीन विजेते निवडले जाणार आहेत. त्यामुळे सहाही वॉर्डमधून एकूण १८ विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास एलसीडी टीव्ही,द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास वॉशिंग मशीन,तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास फ्रिज देण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला साडी भेट देण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. सजावट स्पर्धेत पारंपरिकता,स्वच्छता,आकर्षकता,कल्पकता तसेच पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य देण्यात येणार आहे. सजावटीतून भारतीय संस्कृती व महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम व सर्व सहभागींस बंधनकारक राहणार आहे. तसेच परीक्षकांना सजावट पाहणीसाठी सहभागींच्या घरी भेट देण्याचा अधिकार राहणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयोजकांकडे पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून,नोंदणीसाठी तेजस्विनी गौरव झुरुंगे – ९९७५१५८१७८ यांच्याशी संपर्क साधावा.नोंदणीसाठी मतदान ओळखपत्र व आधार कार्ड आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. लोणीकंद गावातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत नोंदणी करून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,असे आवाहन गौरव राजाराम झुरुंगे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे