सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक-पालकांची दिमाखदार तिरंगा बाईक रॅली
राजू टपाल.
कल्याण:- ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालय,कल्याण यांच्या वतीने शिक्षक व पालकांची भव्य तिरंगा बाईक रॅली उत्साहात पार पडली. “तिरंगा भारताची शान आहे,आपल्या देशाचा अभिमान बाळगूया” हा संदेश देत रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यात आली. कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड,कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी भारताच्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगावा,तसेच १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकाने आपल्या घरी राष्ट्रध्वज फडकवून देशाची शान वाढवावी,असे आवाहन केले. शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांचे स्मरण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्याचे आवाहन केले. कोळशेवाडी पोलीस ठाणे येथून सुरू झालेल्या या रॅलीत शिक्षक व पालकांनी हातात तिरंगा घेत देशभक्तीपर घोषणा देत परिसरात जनजागृती केली. रॅलीचा समारोप कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ड प्रभाग कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या तिरंगा बाईक रॅलीमध्ये ४८ शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी शिक्षक व पालकांना आमदार सुलभा गायकवाड,सहाय्यक आयुक्त उमेश यमगर,शिक्षणाधिकारी विजय सरकटे,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रॅलीच्या आयोजनासाठी शाळेचे पालक संदीप विरनक यांचे सहकार्य लाभले. शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला देशभक्तीचा उत्साह यामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार सहशिक्षक गणेश पाटील यांनी मानले.