सावंतवाडी बुराणगल्लीत २ लाखांचा गुटखा जप्त
एक ताब्यात
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
सावंतवाडी :-सावंतवाडी शहरातील बुराण गल्ली परिसरात अनधिकृत गुटख्यावर धाड टाकत सुमारे २ लाख ८ हजार ३९० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकाने सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणी अब्दुल गनी शहा ( ४४, रा. बुराण गल्ली, सावंतवाडी ) याला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सावंतवाडी शहरातील बुराण गल्ली भागात अनधिकृतपणे गुटखा साठा असल्याची गोपनीय माहिती सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी उशिरा त्या जागी धाड टाकत सुमारे दोन लाख किमतीचा अनधिकृत गुटखा जप्त करण्यात आला.
ही कारवाई गुन्हा अन्वेषण विभागाचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुप कुमार खंडे, चंद्रकांत पालकर यांच्या पथकाने केली.तर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिल धुरी, महेश जाधव, हनुमंत धोत्रे व मनोज राऊत यांनी या कारवाईत सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.