मात्र, या निवडणुकीमध्ये वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांनीही प्रकर्षाने राजकीय पक्षांची बाजू घेत प्रचार केल्याचं निदर्शनास आलं. दोन्ही बाजूंनी हा प्रचार झाल्याचं पाहायला मिळालं.
खरं तर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, धार्मिक आधारावर प्रचार करणं हीच बाब अयोग्य ठरते. पण असं असतानाही, या निवडणुकीत याचा प्रत्यय आला.
एका बाजूला राजकीय पक्षांनी कीर्तनकारांना आपल्या प्रचारासाठीचं माध्यम बनवलं. त्याचवेळी काही कीर्तनकारांनीही वेगवेगळ्या पक्षांच्या 'राजकीय पालख्यां'चे भोई होत, त्यांचे विचार वाहण्याला महत्त्व दिल्याचं दिसून आलं.
वारकरी संप्रदाय आणि राजकारण यांचं आजवरचं नातं कसं राहिलं आहे? अशा प्रकारे कीर्तनकारांनी राजकीय भूमिका घेणं हे संप्रदायाच्या वैचारिक भूमिकेला धरुन आहे का?
या निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कीर्तनकारांनी मतदारांवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे? या आणि अशा प्रश्नांचा धांडोळा आपण घेणार आहोत.
सध्या विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत आध्यात्मिक आघाड्या कार्यरत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या आघाड्या अधिक सक्रिय दिसून येतात.
मात्र, राजकीय प्रचार करण्यामध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या आध्यात्मिक आघाड्या अधिक संघटीत आणि अधिक प्रभावी दिसून येतात.
अलीकडेच शरद पवार यांच्या पक्षाकडूनही आध्यात्मिक आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यावर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली होती.
या निवडणुकीच्या राजकीय आखाड्यामध्ये कीर्तनकारांनी कशाप्रकारे भूमिका निभावली याबाबत आम्ही या आध्यात्मिक आघाड्यांच्या प्रमुखांशीच चर्चा केली.
फोटो कॅप्शन,'शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने'कडून अनेक वारकरी धर्मपरिषदा घेण्यात आल्या.
'भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी'चे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी बोलताना सांगितलं की, "लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान झाल्याचा परिणाम दिसून आला. मुल्ला-मौलवींनी फतवे काढून मुस्लिम उमेदवारांना तसेच महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.
त्यासाठी महाविकास आघाडीचे लोक अल्पसंख्याकांचं लांगूलचालन करत राहिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातील धर्माचार्यांनी आणि सगळ्या पंथाच्या संतांनी एकत्र येत हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या महायुतीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला."
विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कीर्तनकारांची एकजूट करुन कशाप्रकारे महायुतीचा प्रचार केला याविषयीची माहिती 'शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेने'चे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीच्या आधीच आम्ही सर्व जिल्ह्यातील मुख्य कीर्तनकारांची मोट बांधली. प्रत्यक्ष बैठका तसेच शेकडो झूम कॉल मिटींग्स झाल्या.
जिल्ह्या-जिल्ह्यात काम करणारे शिवभक्त, गोरक्षक, कीर्तनकार यांना एकत्र करण्यात आलं आणि त्यातून जिल्हानिहाय रचना ठरवण्यात आली. फक्त वारकरीच नव्हे तर जेवढ्या संप्रदायांचे वेगवेगळे आश्रम आहेत, त्यांच्यापर्यंत निरोप दिले गेले."
"जिल्हानिहाय आम्ही सहा-सात धर्मपरिषदा घेतल्या. 'भक्ती शक्ती संवाद यात्रा' तसेच निवडणुकीच्या आधी तीन महिन्यापूर्वी 'मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा' देखील काढली. त्या माध्यमातून सर्व 36 जिल्ह्यातील संत-महंतांचं एकत्रिकरण केलं.
त्यांच्याकडून हिंदू लोकांच्या श्रद्धांवर घाला घालण्याचं काम करणाऱ्या महाविकास आघाडीचा चेहरा लोकांसमोर उघड करण्याचं काम आम्ही केलं."
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख विठ्ठल (आबा) मोरे यांनी बोलताना सांगितलं की, साधू-संतांच्या पुरोगामी शिकवणीचं प्रतिनिधित्व आपल्याला संविधानामध्ये दिसून येतं.
"हिंदुत्त्ववादी पक्षांकडून साधू-सतांच्या विचारांना बाजूला सारुन जाती-धर्मामध्ये द्वेष पेरला जात आहे. तुकोबा-ज्ञानोबांच्या विचारांच्या पूर्णपणे उलट विचार पसरवला जात असून त्यालाच वारकरी विचार म्हणून रुजवण्याचं काम महायुतीचे लोक करत आहेत.
त्याला उत्तर देण्यासाठी आणि संताचा खरा विचार पुढे आणण्यासाठी म्हणून 15 महिन्यांपूर्वी आम्ही ही आघाडी स्थापन केली. या निवडणुकीत आम्ही प्रचार रथ तयार करुन संपूर्ण राज्यभर दौरा केला. ठिकठिकाणी कीर्तन करुन संतांचा विचार हाच संविधानाचा विचार कसा आहे, हे पटवून देण्याचं काम आम्ही केलं."