कर्डेलवाडी ता.शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एन सी ई आर टी कडून दखल
३६५ दिवसांची शाळा म्हणून राज्यात लौकिक निर्माण केलेल्या शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेच्या अद्भूत कामाची दखल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शिक्षण ,प्रशिक्षण व संशोधन परिषदेने घेतली असून संस्थेचे प्रतिनिधी डॉ.विशाल पजानकर यांच्या नेतृत्वाखालील २५ ते ३० शिक्षण तज्ज्ञांचे पथक महिनाभर या शाळेचा येथील शैक्षणिक स्थितीचा उपक्रमांचा अभ्यास करणार आहेत.
या सर्वेंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शाळेत राबविले जाणारे शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रम ,शिक्षकांकडून राबविली जाणारी शिक्षणपद्धती ,पालकांचा शैक्षणिक कार्यातील सहभाग, परिसरातील स्वयंसेवी व सामाजिक संस्थांकडून शाळेतील उपक्रमांस मिळणारे पाठबळ, ,माजी विद्यार्थ्यांचे शाळेविषयीचे दायित्व याबाबत बारीक सारीक माहितीच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. या अभ्यासाचा एकत्रित अहवाल संस्थेकडून केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.
त्यातून शिक्षण क्षेत्रात काही सार्वत्रिक बदल व सुधारणा होण्याचा अंदाज शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गुणवत्ता दर्जा ड असलेल्या या शाळेतील हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत होते. या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट ,राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षिका बेबीनंदा सकट या दाम्पत्याने या संकटाचे संधीत रूपांतर करताना चारच महिन्यात शाळेचे रूपरंग बदलले .
इमारतीची रंगरंगोटी केल्यानंतर परिसरात रंगीबेरंगी फुलझाडे लावली. विद्यार्व्यांसाठी स्वखर्चाने शौचालय बांधले. शालेय गुणवत्तेत परिपूर्णता येण्यासाठी सकाळी आठ ते सायंकाळी सहा अशी शाळेची वेळ ठेवली. प्रज्ञाशोधच्या तयारीसाठी अधिकचे मार्गदर्शन केले. स्वयंअध्ययन , स्वयंशिस्त, स्वच्छता या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी केल्यानंतर विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढत गेला.
सन २००४ ला या शाळेला पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. सन २००६ ला जिल्हा परिषद अध्यक्ष चषकाने गौरविण्यात आले. केंद्र शासनाने कर्डेलवाडी गावाला निर्मलग्राम म्हणून गौरविले.
२००६ च्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमातही शाळा राज्यात अव्वल ठरली.
सुंदर व एकसारखे हस्ताक्षर, स्वयंअध्ययन, पालक प्रशिक्षण, ग्रामसफाई, विविध स्पर्धा परिक्षा तयारी, आरोग्य तपासणी, वनौषधी लागवड, क्षेत्र भेटी, सणसमारंभ, उत्सव साजरे करणे, राज्यातील शाळांना गुणवत्तेसाठी मार्गदर्शन, आनंद मेळावे, ई लर्निंग कार्यक्रम, अवांतर वाचन, शाळा वर्ग सजावट, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सहशालेय विविध स्पर्धा, स्नेहसंमेलन, स्नेहभोजन, पीक पाहणी व निरीक्षण, बीज संकलन, विद्यार्थी संवाद यात्रा, कॅमेरा प्रशिक्षण, तंत्रज्ञान ओळख, गणिती विज्ञान भाषा ,कोडी, प्रेरणा अभियान, चित्र रांगोळी प्रदर्शन, आदर्शा पालक सन्मान योजना ,गरजूंना आर्थिक मदत, योगा व मेडिटेशन हे उपक्रम या शाळेत राबविले जातात.