कथित पत्रकारच करीत होता ड्रग्सची तस्करी
Raju Tapal
January 21, 2022
36
कथित पत्रकारच करीत होता ड्रग्सची तस्करी....पोलिसांनी सापळा रचला अन केली अटक
ड्रग्सची तस्करी करणाऱ्या कथित पत्रकाराला पडघा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 14.600 ग्रॅम वजनाची एम डी पावडर जप्त केली आहे. तसेच, तीन वेगवेगळ्या वर्तमानपत्रासह न्यूज चॅनलचे ओळखपत्र त्याच्याकडे आढळले.
पत्रकार असल्याने आपल्याला कोणी अडवणार नाही. या अविर्भावात ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका कथित पत्रकाराला मुंबई - नाशिक महामार्गावरील अर्जुनली टोलनाका परिसरात पडघा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. मुस्तकीम नसीम खान (वय 33 रा. गैबिनगर, भिवंडी ) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. तसेच, या कथित पत्रकाराजवळ तीन वेगवेगळ्या वर्तमानपत्रासह न्यूज चॅनलचे ओळखपत्र आढळून आले आहे.
पडघा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांना भिवंडी तालुक्यातील मुंबई - नाशिक महामार्गावरील पडघा नजीकच्या अर्जुनली टोलनाका येथे एक संशयित व्यक्ती ड्रग्सची (एम डी पावडर ) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पडघा टोलनाका परिसरात सापळा रचण्यात आला. तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती पोलिसांनी घेतली. त्यावेळी त्याच्या जवळ 14.600 ग्रॅम वजनाची एम डी पावडर आढळून आली. याची बाजारात किंमत 73 हजार रुपये आहे. शिवाय त्याच्या खिश्यात दैनिक सत्यशोधक राही, जीआरपी आजतक, क्राईम सेव्हन टीव्ही न्यूज प्रा.ली. असे तीन वेगवेगळ्या माध्यमांचा तो पत्रकार असल्याचे ओळखपत्र आढळून आले आहेत .
पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून एम डी पावडरसह दुचाकी असा एकूण 1 लाख 44 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तस्कराला भिवंडी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान हा अटक तस्कर कोणसाठी काम करत होता. त्याचे साथीदार कोण आहेत. अमली पद्रार्थ विक्रीच्या तस्करीत कधी पासून आला याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Share This