केडीएमसीची अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई...
सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांचा दणका,टिटवाळा आणि उंभर्णीत सुरू असलेली बांधकामे निष्कासित
आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार कारवाई,उपायुक्त प्रसाद बोरकर यांचे मार्गदर्शन...
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' प्रभागात अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत.केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी धडक देत सुरू असलेली बांधकामे निष्कासित केली.या कारवाईदरम्यान टिटवाळा येथील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागे सुरू असलेले एका खोलीचे बांधकाम तोडण्यात आले. तसेच उंभर्णी येथील एम.आय. नगर परिसरात सुरू असलेले एका खोलीचे बांधकामही निष्कासित करण्यात आले.या मोहिमेसाठी ठेकेदाराचे दहा कर्मचारी,महापालिकेची पोलीस यंत्रणा तसेच अनधिकृत बांधकाम विभागाचे पथक तैनात करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.महापालिका क्षेत्रात विनापरवानगी बांधकामे करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. मात्र,अशा कारवाया केवळ तात्पुरत्या न राहता अनधिकृत बांधकामांवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने सुरू राहाव्यात,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.अनधिकृत बांधकामांविरोधातील या धडक मोहिमेमुळे 'अ' प्रभागात बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.