महिलेची छेड काढल्याप्रकरणी ACP वर गुन्हा दाखल,
औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार
औरंगाबाद - औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्तावरच शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाईट ड्युटीवर असताना या पोलीस अधिकाऱ्याने रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याच्या प्रकार समोर आला आहे. तर याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी असलेले विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या ओळखीचा एक मित्रही आपल्या पत्नीसोबत तिथे आले होते. त्यामुळे दोघांची भेट झाली. मात्र याचवेळी आपल्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का? अशी विनंती ढुमे यांनी आपल्या मित्राकडे केली. त्यामुळे मित्राने देखील होकार दिला आणि त्यांना आपल्या गाडीत बसवले.
गाडीत बसताना त्यांच्या मित्र आणि त्याची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागच्या सीटवर बसले होते. दरम्यान गाडीत बसताच दारूच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी गाडीतच महिलेची छेड काढायला सुरुवात केली. महिलेच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आल्यावर मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला, अशी पुन्हा मित्राला विनंती केली. तर घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. पण तिथेही महिलेची छेडछाड केली. तसेच महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.