डोळखांब परिसरात अखेर बिबट्या जेरबंद
वनविभागाची मोठी कारवाई
मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांना यश
डोळखांब:- शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरीक्षेत्र अंतर्गत हिंगलोद वनपरिमंडळातील कळभोन्डे येथे २१ एप्रिल २०२६ रोजी ८ वर्षीय कु. कृष्णा भागा अगीवले या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने व्यापक उपाययोजना हाती घेत अखेर संबंधित बिबट्याला आज,१७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता यशस्वीरित्या जेरबंद केले.वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे,ट्रॅप कॅमेरे तसेच लाईव्ह CCTV कॅमेरे बसवले होते.तसेच स्थानिक गस्ती पथक आणि रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) यांच्या माध्यमातून परिसरात सातत्याने गस्त घालून बिबट्याचा मागोवा घेतला जात होता.आज सकाळी संबंधित बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, बिबट्या जेरबंद करण्यात आलेले ठिकाण आणि मृत मुलीच्या घटनेचे ठिकाण हे अवघ्या एक किलोमीटरच्या परीघात असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने बिबट्याला फिजिकल पद्धतीने सुरक्षितरित्या पकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील नियमानुसार कार्यवाही सुरू आहे.या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक शहापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्यजीव) डोळखांब, वनपरीक्षेत्र अधिकारी,रेस्क्यू टीम,वनपाल, पोलीस निरीक्षक कसारा,स्थानिक पोलीस कर्मचारी तसेच कळभोन्डे गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.