शाळा स्तरावरील विविध समित्या बंद/विसर्जित करा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच शासनाकडे निवेदन
अमरावती दि.२३ - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या प्रतिनिधींनी सोमवारी दि.२० जानेवारी २०२५ रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त पुणे सचिन्द्र प्रताप सिंग यांची भेट घेतली. त्यावेळी शाळा स्तरावर असणाऱ्या विविध समित्या, त्यांच्या सभा व त्यामुळे प्रभावित होणारे दैनंदिन अध्यापन कार्य यावर चर्चा झाली. यावेळी शाळा स्तरावरील विविध समित्या बंद/विसर्जित करण्याबाबतचे निवेदन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष
विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिल्याची माहीती राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये त्याच गावातील व परिसरातील बालके शिक्षण घेतात. प्रामुख्याने या बालकांचे पालक शेतकरी-शेतमजूर, कष्टकरी कामगार अशा गरीब घटकातील असतात. शाळेत असणाऱ्या विविध समित्यांमध्ये तेच ते पालक आलटून-पालटून असतात. दरमहा वेगवेगळ्या समितीच्या मिटींगला ते रोजमजुरी सोडून उपस्थित राहू शकत नाही.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ७५% पेक्षा अधिक प्राथमिक शाळांमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक नसून शिक्षकेत्तर कर्मचारी नाही. तसेच बहुतांशी मुख्याध्यापकाला दोन-तीन वर्गाचे अध्यापन कार्य सुद्धा करावे लागते. त्यामुळे शालेय व्यवस्थापन, विविध समित्यांच्या सभा नियोजन व इतिवृत्त अशा सर्व कारणामुळे अध्यापन कार्य प्रभावित होणे अपरिहार्य ठरत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ नुसार शाळा व्यवस्थापन समिती प्रत्येक शाळेत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती वगळता इतर सर्वच समित्या बंद/विसर्जित करून शाळा व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत सर्व काम चालणे योग्य राहील. द्विमासिक सभांमध्ये सध्याच्या समितीच्या अंतर्गत येणारे विषय घेण्याचे नियोजन केल्यास इतर कोणत्याही समित्यांची गरज राहणार नाही.
सद्यस्थितीत प्राथमिक शाळा स्तरावर खालील प्रमाणे समिती आहेत.
(१) शाळा व्यवस्थापन समिती(२) परिवहन समिती
(३) इमारत बांधकाम समिती(४) शालेय पोषण आहार समिती(५) महिला तक्रार निवारण समिती(६) विशाखा समिती(७) माता पालक संघ
(८)शिक्षक-पालक संघ(९) सखी सावित्री समिती (१०) आपत्ती व्यवस्थापन समिती
(११) बाल रक्षक (१२) विद्यार्थी सुरक्षा समिती(१३) प्रहरी क्लब(१४) इको क्लब
(१५) निपुण भारत - माता पालक गट(१६) तंबाखू व्यसनमुक्ती समिती(१७) राजू-मिना मंच(१८) बालहक्क तक्रार निवारण समिती
याशिवाय काही जिल्ह्यात अजून अधिक वेगवेगळ्या समित्या शाळा स्तरावर स्थानिक यंत्रणेने निर्माण केल्या आहेत.करिता या सर्व समित्या बंद विसर्जित करून शाळा व्यवस्थापन समिती हीच एकमेव कायम ठेवूनमुख्याध्यापक-शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळेल व त्यांचे व्यवस्थापकीय कार्य सुद्धा सुकर होईल असा सर्वसमावेशक निर्णय व्हावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून करण्यात आली आहे.