विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे-पाटीलांची अचानक माघार
Raju tapal
November 05, 2024
12
विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे-पाटीलांची अचानक माघार
अकबर, एन्थनी मागे सरले,
आणि मनोज जरांगे-पाटील हादरले.
मालकाच्या इशाऱ्यावरून माघार!
जरांगेंची लढाई मुळातच मराठ्यांसाठी नव्हती. ते फक्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना पाडण्यासाठी आणि गाडण्यासाठी लढत होते. त्यांनी अनेकदा ते मान्यही केले.
मनोज जरांगे पाटलांचा काही तासांत यू-टर्न;
मनोज जरांगें-पाटीलांनी पलटी मारलेली आहे. जनतेच्याही हे लक्षात आले आहे.गाडीतो, पाडीतो, सुट्टी देत नाय… अशी भरपूर डायलॉगबाजी करून मनोज जरांगे पाटील यांनी वातावरण निर्मिती तर केली. परंतु अखेरच्या क्षणी बहुधा मालकाने माघारीचे आदेश दिल्यामुळे जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केलेले आहे.
मुस्लिम आणि दलित समाजाने ऐन वेळी उमेदवार दिले नसल्यामुळे आपण माघार घेत आहोत, असे कारण त्यांनी दिले असले तरी ते पोकळ आहे.मनोज जरांगेच्या एकूणच राजकारणासारखे. काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी मौलाना सज्जाद नोमानी, आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली होती.अनेकांना वाटले मराठा आंदोलन चालवणारे मनोज जरांगे-पाटील आता सेक्युलर मसिहा बनण्याच्या तयारीत आहेत काय?
मननोहन देसाई यांच्या गाजलेल्या अमर, अकबर, एन्थनीचा दुसरा भाग बनवतायत का? त्यासाठी ते बरेच दिवस वातावरण निर्मिती करत होते. कबरींवर जाऊन वाकत होते, चादरी चढवत होते. भाजपा मुस्लिमांना संपवायला निघालेला आहे, अशा प्रकारचे फोकनाड दावे करत होते. मुस्लिमांनीही त्याला प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. उपोषणाच्या काळात त्यांच्या तोळामासा परिस्थितीकडे पाहून डोळे पाणावलेले, त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारे मुस्लीम वारंवार न्यूज चॅनलच्या कॅमेरासमोर झळकत होते. त्यांची अमर, अकबर, एन्थनीवाली पत्रकार परिषद म्हणजे सगळ्याचा जणू क्लायमॅक्स होता. नोमानी यांनी महात्मा गांधी आणि एपीजे अब्दुल कलाम यांची थेट जरांगेंशी तुलना केली. जरांगेंच्या अंगावर मूठभर मांस चढले. इतके दिवस मुस्लिमांच्या पाठिंब्यासाठी केलेली चाटुकारिता कामी आली, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. ही चाटुकारिता करणारे एकाच वेळी हमास आणि औंरगजेबाचा भक्त आहेत, याची त्यांना अजिबातच फिकीर नव्हती.
मुस्लीम मतं आणि दलित मतं आपल्या खिशात आल्यासारखा त्यांचा आव होता. ऐनवेळी नोमानी आणि आंबेडकर यांनी गचांडी दिली. जरांगेंचे १४ उमेदवार तयार होते. परंतु यांनी ना एकही मुस्लीम उमेदवार दिला, ना दलित. मुळात ना नोमानी हा मुस्लीमांचा नेता आणि ना आनंदराज आंबेडकर दलितांचा. त्यामुळे जरांगेंच्या सोबत दोन पोकळ वासे होते. मुस्लीम नेते फक्त जरांगेंच्या फुग्यात हवा भरण्याचे काम करत होते. हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या जरांगेंच्या उचापती मुस्लीम मुल्ला मौलवींना आणि अन्य कट्टरवाद्यांना हव्याहव्याशा वाटत होत्या. आपण मुस्लीमांचे नेते झालो हा जरांगेंचा केवळ भ्रम होता. ते फक्त मजा घेत होते. नेतेपणाचा त्यांचा भ्रम मुस्लिमांनी योग्यवेळी दूर केला.
एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही, याची उपरती जरांगेंना झाली. त्यांनी ते मान्य केले. परंतु त्यांनी दिलेली बाकीची कारणे मात्र अत्यंत तकलादू आहेत. हा गनिमी कावा असल्याचा दावा जरांगे करतायत. तोंड काळे झाल्यावर तोंड काळे झाले असे मान्य करणे हे राजकारणाच्या नियमाविरुद्ध आहे. मी चेहरा मऊ, मुलायम आणि चमकदार करण्यासाठी चारकोल फेसपॅक लावलाय, असे सारवासारव करावी लागते. जरांगे तीच करतायत.
जरांगेंची लढाई मुळातच मराठ्यांसाठी नव्हती. ते फक्त भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना पाडण्यासाठी आणि गाडण्यासाठी लढत होते. त्यांनी अनेकदा ते मान्यही केले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना अधिकच चेव आला होता. याच काळात ते अधिक भरकटले. जास्त ताकदीने शिवीगाळ करू लागले. त्यांचे चेलेचपाटे त्यांना थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान करायला निघाले होते. स्वत:ला राजे म्हणवणारे संभाजीही त्यात होते. जरांगेंच्या वाहत्या पाण्यात आपलेही काही भले होईल यासाठी संभाजीपासून मंबाजीपर्यंत सगळे या भाटगिरीत लागले होते. या सगळ्यांच्या अपेक्षेला टाचणी लावण्याचे काम जरांगे यांनी केले. कारण त्यांना त्यांच्या हायकमांडचा आदेश आला असावा.
राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न अयशस्वी- प्रवीण दरेकर
मराठा समाजाचं आंदोलन बाजूला ठेवून राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. मुस्लीम आणि दलित समाजाला सोबत घेऊन राजकीय समीकरण जुळतंय का हे तपासण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र दलित आणि मुस्लीम समाजाने त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. जातीवर निवडणूक लढवणे आणि जिंकणे सोपं नसतं हे त्यांनी मान्य केलं. देशात असं कधीच झालं नाही. सर्वच समाज एकत्र नांदत असतात. आज मराठा-ओबीसी समाज समोरासमोर उभे करण्याचा प्रयत्न झाला, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली.या आंदोलनाच्या मागचा बोलवता धनी कुणीतरी आहे. आता त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. अंतिम निष्कर्षापर्यंत आताच येता येणार नाही. मात्र पुन्हा पाडापाडी त्यांच्या मनात आलं तर ते भूमिका बदलू शकतात. जर त्यांनी पाडापाडीचं धोरण अवलंबवलं तर त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
Share This