ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रमुख मेधा पाटकर यांना गुजरातमधील एका अब्रू नुकसानीच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावण्यात आली होती. आज त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
व्ही.के.सक्सेना यांच्या तक्रारीवरून पाटकरांविरोधात 2001 मध्ये मानहानीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या प्रकरणी दिल्लीतल्या एका न्यायालयाने 2024 मध्ये मेधा पाटकरांना पाच महिन्यांच्या तुरुंगवास ठोठावला होता.
सोबतच त्यांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई व्ही.के.सक्सेना यांना देण्याचे आदेशही कोर्टाने दिले होते. सक्सेना सध्या दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत.
हे प्रकरण 2001 चं आहे. त्यावेळी व्ही.के.सक्सेना यांनी मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाविरोधात एक जाहिरात छापली होती. या आंदोलनाद्वारे पाटकर नर्मदेवर बांधल्या जात असलेल्या धरणाचा विरोध करत होत्या.
सक्सेना यांच्या जाहिरातीविरोधात पाटकरांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या पत्रकात त्यांनी सक्सेना यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याची तक्रार सक्सेना यांनी पोलिसात केली होती.
त्यानंतर अहमदाबादच्या एका कोर्टात 2001 साली हे प्रकरण आलं, त्यानंतर हे प्रकरण दिल्लीला स्थलांतरित करण्यात आलं. त्याचा निकाल 1 जुलै 2024 रोजी लागला.
या वेळी स्थानिक प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी राघव शर्मा म्हणाले की, त्यांचं वय आणि तब्येत पाहता त्यांना एक ते दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येत नाही.
शिक्षेच्या आदेशानंतर मेधा पाटकर यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली होती.
आपणही सक्सेनांविरोधात तक्रार दाखल केली होती, त्या प्रकरणांवर अद्याप निकाल लागलेला नाही, असं पाटकरांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या होत्या, "आम्ही आधीच सांगितलं होतं. ज्या प्रेसनोटच्या आधारे हा मानदानीचा दावा केलाय. ती मी प्रसिद्ध केली नव्हती. त्याचे पुरावेही त्यांनी दिले नाहीत. परंतु ज्या प्रकरणात हे झालं, त्या सक्सेना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नर्मदा बचाव आंदोलनाचा विरोध केला होता. त्यात आम्ही विकासविरोधी आहोत असं म्हटलं होतं. मी विकासविरोधी नाही, मी कोणत्याही व्यक्तिविरोधात नाही. पण विकासाच्या नावाखाली ज्यांचं शोषण होतं, त्यांच्याबाजूने मी उभी राहाते. पर्यावरणासंदर्भात घोटाळे होत असतील तर त्यावर प्रश्न उपस्थित करणं आमचा हक्क आहे."
नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या विविध धरण प्रकल्पांमुळे हजारोंचं विस्थापन होणार होतं. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या अनेकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होणार होता. यांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठीच्या या गटाच्या मोहीमेचं नेतृत्त्वं मेधा पाटकर आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी केलं.
2011 साली या मोहिमेसाठी बॉलिवुड अभिनेता आमीर खाननेही मेधा पाटकर यांना पाठिंबा दिला होता. निसर्ग जपणं हा या मोहिमेचा एकमेव हेतू होता, असं गुजरातमधले पर्यावरण कार्यकर्ते आणि नर्मदा बचाव आंदोलनात पाटकर यांच्यासोबत असणाऱ्या रोहित प्रजापती यांनी बोलताना सांगितलं.
"या धरणांमुळे समुद्रपातळीत वाढ होईल असा इशारा आपण तेव्हा दिला होता आणि आता तसंच घडलं असून भरूच शहरात जिथे नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते तिथे समुद्र आत आला आहे," असं प्रजापती सांगतात.
गुजरातेतल्या नर्मदा खोऱ्यामध्ये आदिवासींसाठी राबवलेल्या मोहिमेमुळे मेधा पाटकर गुजरातमध्ये वादग्रस्त ठरल्याचं अनेकांना वाटतं.
पाटकरांनी उचललेली पावलं सत्तेतल्या भाजपला न आवडणारी असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात.
2002 मध्ये मेधा पाटकर इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. गुजरातमधल्या गोध्रा दंगलींनंतर त्या स्थानिकांना भेटून त्यांच्याशी बोलत होत्या. हल्ल्याच्या या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला होता.