कुटुंब नियोजनासाठी पुरुषांचा पुढाकार;सुरक्षित भविष्याची दिशा
ठाणे :- कुटुंबाचे आरोग्य,आर्थिक स्थैर्य आणि भावी पिढीचे सुयोग्य संगोपन करण्यासाठी कुटुंब नियोजन अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये पुरुषांचा सहभाग वाढावा तसेच पुरुष नसबंदीचे प्रमाण वाढावे,या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे दरवर्षी ‘पुरुष नसबंदी पंधरवडा’ आयोजित केला जातो.
यावर्षी हा उपक्रम २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून त्यांनी सर्व आरोग्य संस्था,वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समन्वयातून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी कुटुंब नियोजनासाठी पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन समाजात सकारात्मक संदेश निर्माण करण्याचे आवाहन केले. मोहिमेच्या संपूर्ण अंमलबजावणीचे कार्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
मोहिमेचे मुख्य उद्दिष्टे
• पुरुष नसबंदीबाबतचे गैरसमज दूर करणे
• कुटुंब नियोजनात पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढवणे
• नसबंदी प्रक्रिया सुरक्षित, वेदनारहित व सोपी आहे याबाबत जनजागृती करणे
• सर्व आरोग्य संस्थांद्वारे अधिकाधिक लाभार्थ्यांना सेवा उपलब्ध करून देणे
मोहिमेचे दोन प्रमुख टप्पे
१) जनजागृती सप्ताह
दि. २१ ते २७ नोव्हेंबर २०२५
• गावपातळीपासून शहर पातळीपर्यंत व्यापक जनजागृती
• घरभेटी, आरोग्य शिक्षण, समुपदेशन
• पुरुष नसबंदीबाबत शंका निरसन
२) सेवा वितरण सप्ताह
दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५
• सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये नसबंदी शस्त्रक्रिया उपलब्ध
• शस्त्रक्रियेनंतर आवश्यक औषधे व वैद्यकीय सल्ला
• शासनमान्य प्रोत्साहनपर लाभांचे वितरण
पुरुष नसबंदी – सोपी, सुरक्षित आणि प्रभावी प्रक्रिया
• केवळ १०-१५ मिनिटांची सोपी शस्त्रक्रिया
• लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही
• दीर्घकालीन व प्रभावी कुटुंब नियोजन पद्धत
• कुटुंबाच्या आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय
“कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढवा – सुरक्षित भविष्य निवडा.”
ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सर्व नागरिकांना आवाहन करतो की पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होऊन कुटुंबाचे आरोग्य व भविष्य सुरक्षित करावे.