आमदार योगेश कदम कार अपघात प्रकरणी फरार वाहनचालकाला यूपीतून अटक
Raju Tapal
January 10, 2023
46
आमदार योगेश कदम कार अपघात प्रकरणी फरार वाहनचालकाला यूपीतून अटक
आमदार योगेश कदम कार अपघात प्रकरणी एक मोठं अपडेट समोर आलं आहे.आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पाठीमागून धडक देऊन फरार झालेल्या वाहनचालकाला पोलिसांनी अटक केलं आहे.आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला पकडले. आरोपी उत्तरप्रदेश येथील जनाडी बलिया गावातील आहे. अकलेश नरसिंग यादव असं आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला जामीनावर सोडण्यात आले आहे. गाडीचे ब्रेक लायनर जाम झाल्याने ब्रेक न लागल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला, अशी त्यानं जबाबात कबुली दिली आहे.आमदार योगेश कदम यांच्या गाडीला सहा जानेवारी रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली होती. आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली होती. यानंतर टँकर पलटी झाला होता आणि चालक पळून गेला होता. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली होती. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले होते.
योगेश कदम हे खेड दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघातून आमदार आहेत. ते माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आहेत. शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत शिंदे गट जवळ केला. या अपघातानंतर योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. 'या अपघाताचा पॅटर्न जरा वेगळा आहे. त्यामुळे यात घातपाताची शक्यता आहे. या अपघाताबाबत तपास करण्यासाठी मी पोलिसांना सांगितलं आहे. तसेच, या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही केली आहे', असं योगेश कदम म्हणाले होते. आम्हाला जी शंका आली आहे, त्यादृष्टीनं तपास करुन सत्य जर पुढे आलं, तर चांगलंच आहे. भविष्यात त्या दृष्टीनं काळजी घेता येईल. चौकशी करून या अपघाताचा जो काही अहवाल आहे, तो समोर येईल. आम्हाला शंका आली म्हणून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करतोय, असंही योगेश कदम म्हणाले होते.
राज्यात गेल्या काही दिवसात नेत्यांच्या रस्ते अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. आमदार विनायक मेटे यांचा पुणे-मुंबई हायवेवर अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा देखील भीषण अपघात झाला होता. तर गेल्या आठवड्यात आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला देखील अपघात झाल्यानं त्यांना मार लागला होता.
Share This