• Total Visitor ( 84676 )

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला

Raju Tapal March 03, 2023 112

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर स्टंपने हल्ला
मुंबई:-मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली.मिळालेल्या माहितीनुसार, संदीप देशपांडे मॉर्निग वॉकला गेले असता त्यांच्यालर चार अज्ञातांकडून हल्ला झाला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.देशपांडे हे समाजमाध्यमांवर नेहमीच टीका करीत असतात, त्यांचा राग मनात ठेवून हा हल्ला झाला असल्याची चर्चा आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
दादरच्या शिवाजी पार्क येथे चार अज्ञात व्यक्तींनी देशपांडेंवर प्राणघातक हल्ला केला आहे.क्रिकेटच्या स्टॅम्पने डोक्यावर मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगण्यात आले. त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता, त्यामुळे त्यांना ओळखता आलेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.या घटनेमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा नियोजीत हल्ला असल्याचा मनसेने आरोप केला आहे. देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.
संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.
1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Share This

titwala-news

Advertisement