मुलीने माहेरचे घर पेटविले
Raju tapal
October 18, 2024
42
मुलीने माहेरचे घर पेटविले
आंबेगाव येथील घटना ;
सर्व वस्तू जळून खाक,
मुलीवर गुन्हा दाखल
सावंतवाडी :-वडिलांनी सासरी जाण्यास सांगितल्याच्या रागातून मुलीने माहेरच्या घराला आग लावण्याचा प्रकार तालुक्यात घडला आहे. यात घर आणि घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे अंदाजे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी आंबेगाव येथे घडली. दरम्यान याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मुलीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मात्र तिचे आणि पतीचे पटत नाही. त्यामुळे ती चतुर्थीच्या काळात आंबेगाव येथील आपल्या घरी आली होती. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा तिने आपल्या आई-वडिलांसोबत वाद उकरून काढला. यावेळी घरातील लोकांना कंटाळून ते दुसऱ्या मुलीकडे राहायला गेले होते. आज सकाळी किरकोळ भांडण काढून तिने थेट घरालाच आग लावली आणि सर्व वस्तू पेटवून दिल्या. हा प्रकार आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी पाहिला व याची कल्पना संबंधित मुलीच्या वडिलांना दिली. मात्र ते गोव्यात असल्यामुळे येईपर्यंत उशिर झाला. सर्व दरम्यान शेजाऱ्यांनी आज विझवण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यांचे प्रयत्न असफल ठरले. या आगीत त्यांचे घरातील सर्व साहित्य कपडे जळून खाक झाले आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. झालेला प्रकार हा आपण रागाच्या भरात केला, अशी कबुली मुलीने दिली. हे घर इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आले होते. मात्र अचानक हा प्रकार घडल्यामुळे आता संबंधित विवाहितेच्या वडीलांचे कुटुंब बेघर झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली व पंचनामा केला आणि वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलीवर गुन्हा दाखल केला आहे.
Share This