बकोरी ग्रामपंचायतीतील गैरप्रकाराबाबत चौकशीचे आदेश
फुलगाव(गौतम पाटोळे):- बकोरी तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमितता,विकासकामांतील गैरप्रकार,निकृष्ट रस्ते कामे तसेच ‘वैकफिल्ड फूड्स प्रा. लि.’ संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश पंचायत समिती हवेलीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या तक्रारींच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी २३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पुणे कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र,२२ ऑगस्ट रोजी बकोरी ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी होणार असल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होऊन दोषींवर नियमानुसार कारवाई करावी,अशी मागणी वारघडे यांनी केली आहे. चौकशी योग्य प्रकारे न झाल्यास पुढील काळात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.