• Total Visitor ( 730098 )
News photo

धामारी येथे सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

Raju Tapal publisher October 17, 2026 29

धामारी येथे सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...





शिरूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’,‘व आयुष ग्राम’ या उपक्रमांतर्गत गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी धामारी येथील ग्रामपंचायत इमारतीत आयोजित सर्वरोग निदान शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्करोग तपासणी,नेत्रतपासणी, हिमोग्लोबिन,रक्तशर्करा आणि ईसीजी यांसारख्या तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या. तसेच आयुर्वेदिक सल्ला,व्यसनमुक्तीविषयक मार्गदर्शन आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार मोफत औषधवाटप करण्यात आले. ३१८ ते ३२२ रूग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गजानन पाटील साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ रामचंद्र हंकारे, जिल्हा आयुष अधिकारी मा.डॉ .चिद्दरवार सर आणि शिरूर तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ. पायल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली,व जिल्हा आयुष कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. इनामदार सर यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र,केंदूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राम चेपटे आणि डॉ. आयेशा निसार मॅडम यांच्या सहकार्याने शिबिराची अंमलबजावणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन विस्तार अधिकारी तथा धामारी गावचे प्रशासक श्री. खोडदे यांच्या हस्ते झाले. यावेळी धामारी गावच्या माजी सरपंच सीमाताई शेळके,माजी सरपंच एकनाथ डफळ, संपतराव कापरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोतीबिंदू रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भ शिबिरात विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी जाणून घेतल्या. कर्करोगाचे प्राथमिक निदान करण्यासाठी स्क्रीनिंग,डोळ्यांची तपासणी,हिमोग्लोबिन व रक्तातील साखरेची तपासणी तसेच ईसीजी करण्यात आला. तपासणीदरम्यान १८ रुग्णांमध्ये मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले. संबंधित रुग्णांना पुढील तपासणी व उपचारांसाठी संदर्भ सेवा देण्यात आली. 

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रमेश गायकवाड, डॉ. जबिन पठाण आणि डॉ. सागर शिंदे,नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया डोके-जाधव,आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्रेया देवरे (वाघोली),तसेच आयुष्मान आरोग्यवर्धिनी मंदिर (आयुष)पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब वाघमोडे यांनी रुग्णसेवेत सहभाग घेतला. मोफत औषधवाटप आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती तपासणीनंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे रुग्णांना मोफत वाटप करण्यात आले.  विविध संस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान

या शिबिरासाठी साने गुरुजी आरोग्य केंद्र शालाक्य विभाग हडपसर;ग्लोबल हेल्थ फाउंडेशन सांगवी, भूमिका व्यसनमुक्ती केंद्र राजगुरुनगर तसेच शिक्रापूर व पुणे परिसरातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहकार्य केले व निमा डॉक्टर संघटना पिंपरी चिंचवड यांचेही सहकार्य लाभले. व्यसनमुक्तीविषयक मार्गदर्शनासाठी संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला,तर आयुर्वेद विभागामार्फत आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. या शिबिरासाठी द असोसिएशन ऑफ शालाकी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. राजेंद्र लाहोरे सर यांनी कान व डोळ्यासाठी मोफत औषध साठा उपलब्ध करून दिला. 

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी सारिका राठोड,औषध निर्माण अधिकारी संदीप खैरे,योग प्रशिक्षक अंकुश घारे,आरोग्य सेवक निलेश शेंडे,अविनाश भारती व अजित पडवळ,आरोग्य सेविका जया मंडलिक,हिंगे,आशा सेविका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ग्रामसेवक ठुबे मॅडम,आरोग्य विभागातील गायकवाडताई,शेळकेताई आणि इतर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. माजी आरोग्य सेवक शिवाजीराव पावशे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष) पथक,धामारी,ग्रामपंचायत धामारी आणि आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नागरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे,आजारांचे वेळेवर निदान करण्यास मदत करणे आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता  शासनाचा आरोग्य विभाग,ग्रामपंचायत,वैद्यकीय तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून ‘निरोगी नागरिक,निरोगी गाव आणि निरोगी महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या दिशेने धामारीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.

योग प्रशिक्षक अंकुश घारे यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement